नववर्षाचा पहिला सण मकर संक्रांती हा सर्वत्र उत्साहात साजरा करतात. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करतात. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस किक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ काम करीत नाहीत असे सांगितले जाते.
फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले. आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो. पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो. हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही.
किंक्रांतच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे सांगितले जाते, किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी राखून ठेवली जाते आणि ती शिळी भाकरी खाल्ली जाते, केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे सांगितले जाते, तसेच दुपारी हळदी-कुंकू करतात. अशा काही प्रथा किंक्रांतला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात. तसेच, यादिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचीही प्रथा आहे.
दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस 'मट्टू पोंगल' म्हणून साजरा करतात. या दिवशी गाई-बैलांना स्नान घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवतात. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळे सोडतात. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रमही केला जातो.
चांगल्या कामाची सुरवात करू नये.
लांबचा प्रवास टाळावा.
देवीचा पूजा करून गोडाधोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा.
घरात वादविवाद टाळा, मन शांत ठेवा. शांत चित्त ठेवून सर्वांशी आदराने वागावे.
कुलदैवताचे व देवाचे पूजा तसेच नामस्मरण करावे. नामजप करावा.