Mahatma Phule Jayanti 2024: महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांची जयंती दरवर्षी ११ एप्रिल रोजी साजरी केली जाते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील सातारा येथे एका माळी कुटुंबात झाला होता. मात्र, नंतर त्यांचे कुटुंब पुण्यात आले आणि फुलांशी संबंधित व्यवसाय करू लागले, म्हणून त्यांना 'फुले' हे आडनाव मिळाले. ज्योतिराव फुले यांना 'ज्योतिबा फुले' म्हणूनही ओळखले जाते. समाजातील वंचित आणि अनुसूचित लोकांसाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन, १८८८मध्ये मुंबईत एका विशाल जाहीर सभेत त्या काळातील प्रख्यात समाजसेवक राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी त्यांना 'महात्मा' ही पदवी दिली. तेव्हापासून त्यांच्या नावात महात्मा जोडले जाऊ लागले.
भारतातील समाजसुधारक, विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ आणि क्रांतिकारी कार्यकर्ते म्हणून महात्मा फुले यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 'सत्यशोधक समाज' या संघटनेची स्थापना केली होती, ज्याचा उद्देश समाजातील तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी काम करणे हा होता.
ज्योतिबा फक्त एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांची आई देवाघरी गेली. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण मराठीत झाले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांच्या अभ्यासात अंतर पडले. त्यानंतर वयाच्या २१व्या वर्षी त्यांनी इंग्रजी माध्यमातून सातवीचे शिक्षण पूर्ण केले. १८४०मध्ये ज्योतिबा फुले यांचा विवाह सावित्रीबाईंशी झाला. १८४८मध्ये ज्योतिबा फुले त्यांच्या एका ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले होते. तिथे काही लोकांनी त्यांच्या जातीच्या आधारावर जेवण वाढले जात होते. त्यांचा अपमान आणि हे वर्तन पाहून ज्योतिबा फुले यांनी समाजातील विषमता नष्ट करण्याची शपथ घेतली.
महात्मा फुले यांचे संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यात गेले. त्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या हक्कांसाठीही काम केले. यासोबतच त्यांनी महिलांसाठी देखील खूप काम केले. मुलींना शिक्षण देणे, बालविवाह थांबवणे आणि विधवांचे पुनर्विवाह अशी कामं त्यांनी केली.
स्त्रिया सुशिक्षित असतील तरच समाज आणि देशाची प्रगती होऊ शकते, असे ज्योतिबा फुले यांचे मत होते. जेव्हा मुली आणि स्त्रियांच्या शिक्षणासाठी देशात कोणतीही शाळा व्यवस्था नव्हती, तेव्हा १८४८मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा उघडली. त्यांनी मुलींसाठी शाळा तर उघडली. पण, त्यात शिकवायला शिक्षक तयार होत नव्हते. त्यानंतर ज्योतिबा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः शिकवले आणि त्यांना शिक्षिका बनवले. यानंतर सावित्रीबाईंनी मुलींसाठी सुरू केलेल्या शाळेत शिकवायला सुरुवात केली होती.
समाजातील काही लोकांनीही त्यांच्या कामात अडथळा आणला. त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला. परिणामी ज्योतिबा फुले यांना कुटुंब सोडावे लागले. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाच्या कामात काही अडथळे निर्माण झाले, पण लवकरच फुले दाम्पत्याने सर्व अडथळे पार करून मुलींसाठी आणखी तीन शाळा उघडल्या. ज्योतिबा फुले यांच्या पत्नीने त्यांना प्रत्येक कामात पूर्ण साथ दिली. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८८३मध्ये ज्योतिबा फुले यांचा गौरवही केला. महात्मा फुले यांचे विचार समाजातील एका मोठ्या वर्गाला प्रेरणा देणारे आणि क्रांती निर्माण करणारे आहेत.