मराठी बातम्या  /  धर्म  /  Mangal grah mandir : जगातील एकमेव मूर्तीरूपी मंगळ ग्रह मंदिर कुठे आहे माहित्येय? काय आहे माहात्म्य?

Mangal grah mandir : जगातील एकमेव मूर्तीरूपी मंगळ ग्रह मंदिर कुठे आहे माहित्येय? काय आहे माहात्म्य?

HT Marathi Desk HT Marathi
Feb 06, 2023 07:12 PM IST

Mangal grah Mandir Amalner : देवी-देवतांची मंदिरं देशात जागोजाग आहेत. मात्र, एखाद्या ग्रहाचं मंदिर सापडणं दुर्मिळ. असं एक मंदिर आपल्या महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथं आहे.

Mangal Grah Mandir
Mangal Grah Mandir

Mangal grah Mandir Amalner : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळदेव ग्रह मंदिर संपूर्ण भारतातील अतिप्राचीन, अतिदुर्मिळ आणि अतिजागृत देवस्थान म्हणून मान्यता मिळालेले वैश्विक पातळीवरील अनेकार्थी हटके देवस्थान आहे.

ट्रेंडिंग न्यूज

श्री मंगळग्रह मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. मंदिराला शेकडो वर्षांचा इतिहास असल्याचे बोलले जाते. मात्र, मंदिर कोणी बांधले, मूर्तीची स्थापना कोणी व केव्हा केली, या संदर्भातील अधिकृत माहिती उपलब्ध नाही. अमळनेर शहरासह परिसरातील काही जाणकारांच्या मते श्री मंगळदेव ग्रह मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार सन १९३३ मध्ये झाला. परंतु १९४० नंतर मंदिर पुन्हा दुर्लक्षित व नंतर भग्न झाले. १९९९ नंतर झालेल्या जीर्णोद्धाराने मंदिर आणि परिसराचा आता पूर्णपणे झालेला कायापालट भाविक, भक्तांना आकर्षित करण्यात दिवसागणिक यशस्वी ठरत आहे. मागील काही वर्षांत येथील विविध विकासकामांचा व सोयी-सुविधांचा वेग कमालीचा गतिमान झालेला आहे. मंदिराचा परिसर सुमारे १५ एकर आहे. दर मंगळवारी सुमारे ८० हजार ते एक लाखापर्यंत तथा पर्यटक मंदिरात येतात.

श्री मंगळदेव ग्रहाची पौराणिक, शास्त्रीय माहिती अन् महती!

युद्धाची, ॠणमुक्तीची, भव्य निर्मितीची देवता अशी मंगळ ग्रह देवतेची ओळख आहे. जयविख्यात विश्वकर्मा यांच्या विशाल आणि अद्भुत नगरीच्या निर्मितीत मंगळदेव ग्रहाची कृपा होती असी मान्यता आहे. 

पौराणिक कथेनुसार ग्रहांना देवतेचे स्थान प्राप्त आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला अनन्यसाधारण महत्व आहे. विवाहयोग, गुणमिलन, विवाह न जुळणे, घटस्फोट, विधुरता, अपघात भय, मोठ्या शस्त्रक्रिया, यासाठी मंगळाचा विचार केला जातो. 

वैद्यकीय ज्योतिष शास्त्रात मंगळाचा आपल्या शरीरातील रक्तावर अमल असतो. कुंडलीत मांगलिक योग असेल तर कुंभ विवाह करण्याचे प्रयोजन शास्त्रात सांगितले आहे. मंगळदेव ग्रह मंदिरात विशेषत्वाने जे मांगलिक आहेत किंवा ज्या मुला-मुलींचा विविध कारणांमुळे विवाहयोग जुळून येत नाही असे विवाहेच्छुक येत असतात. 

श्री मंगळग्रह देवता भूमिपुत्र असल्याने ज्यांचा संबंध शेती, माती आणि रेतीशी आहे असे व्यावसायिक म्हणजेच शेतकरी, सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट, बिल्डर, डेव्हलपर व ब्रोकर ही मंडळी श्री मंगळग्रह देवतेला आराध्य दैवत मानतात. त्यामुळे ते मोठ्या संख्येने मंदिरात येतात.

श्री मंगळदेव ग्रह देवता ही युद्धदेवता असल्याने ज्यांचा संबंध सुरक्षेशी आहे. म्हणजेच पोलिस, सैन्य दल व सुरक्षारक्षक हेही गंगळग्रह देवतेला आराध्य दैवत मानतात. त्यामुळे या क्षेत्रातील भाविकांची संख्याही लक्षणीय आहे.

मंगळग्रह देवता ही रोगमुक्तीची, ऋणमुक्तीची, भयमुक्तीची आणि समृद्धी देणारी असल्याचे मानले जाते. जे काही मागितले ते सर्व देणारी ही देवता असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. शास्त्रात मंगळग्रह देवतेला दानी म्हटले आहे. त्यामुळे त्यांची आपल्यावर सतत कृपा व्हावी, यासाठीही मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येथे भाविक येत असतात.

मंगळदेव मंदिरात होणाऱ्या विविध पूजा-अभिषेक

मंदिरात सामूहिक अभिषेक, स्वतंत्र अभिषेक, दर मंगळवारी होणारा पंचामृत अभिषेक, मंगळवार सोडून इतर दिवशी होणारा नित्यप्रभात मंगलाभिषेक, हवनात्मक अभिषेक, भोमयाग आदी सशुल्क पूजा-अभिषेक होतात. मंगळवारी होणारा पंचामृत अभिषेक वगळता सर्व पूजा-अभिषेक रोज होतात. दर शुक्रवारी मंदिरात श्रीयंत्रावर कुंकूमार्चन पूजा होते. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी व दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा होते. दर पौर्णिमेला श्री गायत्री महायज्ञ होतो. रोज सूर्योदय व सूर्यास्तास अग्रिहोत्र पूजा होते. दरवर्षी त्रिपुरा पौर्णिमेस श्री तुलसी विवाह महासोहळा होतो. दरवर्षी भाद्रपद शुद्ध १० रोजी श्री मंगळग्रह जन्मोत्सव साजरा होतो. श्री हनुमान जन्मोत्सव व नवरात्रोत्सवही होतो. त्या निमित्ताने नवचंडी व शतचंडी महायाग होतो.

जगाच्या पाठीवर एकमेव असलेल्या या मंगळग्रह मंदिरात जगभरातील भाविक, भक्त दर्शनास येतात. एरवी अनिष्ट मंगळग्रह, अमंगलकारी मंगळग्रह असा समज असलेल्या या मंगळ ग्रहाच्या दर्शनाने जीवन मंगलमय होईल अशी भाविकांची श्रद्धा आहे.

जय अर्जुन घोडके

jaynews21@gmail.com

(लेखक ज्योतिष विद्येचे अभ्यासक आहेत.)

WhatsApp channel

विभाग