मुंबई-चेन्नई सामन्यात महेंद्रसिंह धोनी शेवटच्या षटकात फलंदाजीला आला. त्याने येताच हार्दिक पंड्याची हवा काढली. धोनी ४ चेंडूत तीन सलग षटकारांसह २० धावा ठोकल्या. या विध्वंसक खेळीच्या बळावर महेंद्रसिंह धोनीने एक खास विक्रम केला आहे.
धोनीच्या ५ हजार धावा : एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना ५ हजार धावा पूर्ण केल्या. धोनीने मुंबईविरुद्ध नाबाद २० धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीच्या बळावर त्याने ५ हजार धावांचा आकडा गाठला. चेन्नईसाठी ५ हजार धावा करणारा धोनी दुसरा फलंदाज ठरला. याआधी रैनाने ही कामगिरी केली आहे. धोनीने सीएसकेसाठी २५० सामन्यांच्या २१८ डावांमध्ये २३ अर्धशतकांसह ५०१६ धावा केल्या आहेत.
महेंद्रसिंह धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्ससंघाकडून खेळला आहे. धोनीने आतापर्यंत २५६ आयपीएल सामन्यांच्या २२२ डावात ५१४१ धावा केल्या आहेत. धोनीने आयपीएलमध्ये दोन्ही संघांसाठी एकूण ३५३ चौकार ठोकले आहेत. त्याने २४५ षटकार ठोकले.
सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जकडून इंडियन प्रीमियर लीग आणि चॅम्पियन्स लीग टी-20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने चेन्नईकडून २०० सामन्यांच्या १९५ डावांमध्ये ५५२९ धावा केल्या आहेत. सीएसकेकडून रैनाने २ शतके आणि ३८ अर्धशतके झळकावली आहेत. रैनाने चेन्नईकडून फलंदाजी करताना ४९४ चौकार आणि २१९ षटकार ठोकले.
चेन्नई सुपर किंग्जकडून सुरेश रैना आणि महेंद्रसिंह धोनीनंतर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज फाफ डू प्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने सीएसकेकडून १०० सामन्यांच्या ९३ डावांत एकूण २९३२ धावा केल्या आहेत. फाफने एकही शतक झळकावले नसले तरी त्याने २१ अर्धशतके झळकावली. चेन्नईकडून डुप्लेसिसने २६९ चौकार आणि ९३ षटकार ठोकले आहेत.