मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; अस्तित्वाच्या लढाईत कोण मारणार बाजी?

Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी; अस्तित्वाच्या लढाईत कोण मारणार बाजी?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 27, 2022 08:46 AM IST

maharashtra political crisis : गेल्या दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी आज होणार आहे. विशेष म्हणजे आजची सुनावणी सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे.

maharashtra political crisis live updates
maharashtra political crisis live updates (HT_PRINT)

maharashtra political crisis live updates : गेल्या अनेक दिवसांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या राज्यातील सत्तासंघर्षावर अखेर आज सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी विस्तारीत खंडपीठाची नियुक्ती केली होती. त्यानंतर मागच्या सुनावणीत कोणताही निकाल दिला नव्हता. त्यामुळं आज होणाऱ्या सुनावणी कोर्ट कुणाच्या बाजूनं निकाल देणार, याकडं देशाचं लक्ष असणार आहे.

शिवसेनेच्या चिन्हावर आणि पक्षावर जो दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता, त्यावर आणि कोर्ट निकाल देईल. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या निलंबनाची याचिका, विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपालांचे अधिकार आणि पक्षांतरबंदी कायदा अशा मुद्द्यांवर कोर्टात युक्तिवाद झाल्यानंतर निर्णय देण्यात येणार आहे. त्यामुळं आता खरी शिवसेना कुणाची याचा फैसला आज होणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह शिवसेनेतून बंड केलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. या प्रकरणानंतर शिवसेना आणि शिंदे गटाकडून न्यायालयात परस्परविरोधी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळं आजच्या सुनावणीत शिंदे-फडणवीस सरकारचं भविष्य अवलंबून असणार आहे.

कोण असणार न्यायाधीश?

माजी सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीसाठी विस्तारीत खंडपीठाची स्थापन केली होती. या खंडपीठाचे प्रमुख न्या. धनंजय चंद्रचूड आहेत. तर त्यांच्यासोबत न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती नरसिंहा आणि न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे.

कोणत्या याचिका महत्त्वाच्या?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर तात्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांना अपात्रतेची नोटिस बजावली होती. त्यानंतर शिंदे गटानं याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मुख्यत्वे ही याचिका फार महत्त्वाची आहे. यावर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. याशिवाय शिवसेनेनं राज्यपालांनी घटनाबाह्य काम केल्याचा आरोप करत राज्यपालाविरोधात कोर्टात धाव घेतली होती. शिवसेना कुणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे, त्यावरही आज निकाल येण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point