मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Shinde-Fadnavis Govt : राज्यातील मुस्लिम लोकसंख्येचा होणार सर्वे; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Shinde-Fadnavis Govt : राज्यातील मुस्लिम लोकसंख्येचा होणार सर्वे; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

HT Marathi Desk HT Marathi
Sep 26, 2022 12:05 PM IST

Muslim Survey in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम विद्वानांची भेट घ्यायला सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमिवर आता शिंदे-फडणवीस सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

Muslim Survey in Maharashtra
Muslim Survey in Maharashtra (Satish Bate/HT PHOTO)

Muslim Survey in Maharashtra : राज्यात पीएफआय या संघटनेवर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळं राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता राज्यातील मुस्लिम लोकसंख्येचा सर्वे करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारनं घेतला आहे. मुस्लिम समाजातील सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती या सर्वेतून गोळा केली जाणार आहे. त्यानंतर त्यात समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर विकासयोजना आणि धोरणं आखली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील ५६ शहरांमध्ये होणार सर्वेक्षण...

राज्यातील ५६ शहरांमध्ये मुस्लिमांचं सर्वेक्षण केलं जाणार असून त्यासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. २०१३ साली मेहमुदर रेहमान यांच्या अध्यक्षतेखाली मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. त्यानंतर आता मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर पुन्हा नव्यानं अभ्यास करून अहवाल सादर केला जाणार आहे. या सर्वेत राज्यातील मुस्लिमांना आतापर्यंत शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या योजनांमध्ये किती फायदा झाला किंवा किती योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या याचा अभ्यास केला जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी शिंदे सरकारनं ३४ लाखांची तरतूद केली आहे.

अल्पसंख्यांक विकास विभाग स्वत: मुख्यमंत्र्यांकडेच...

अल्पसंख्यांक विकास विभाग हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंच हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात मुस्लिम मतदारांचा टक्का मोठा असल्यानं त्यांना आपल्या बाजूनं वळवण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

याबाबत बोलताना भाजपचे प्रवक्त केशव उपाध्ये म्हणाले की, मुस्लिम असो हिंदू, आम्ही सर्वांचा विकास करत आलेलो आहे. सर्व धर्माच्या लोकांपर्यंत केंद्राच्या योजना आणि विकासाची धोरणं पोहचायला हवीत, त्यासाठी हा सर्वे केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील विविध मुस्लिम विद्वानांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली होती. भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष सुहैल इलियासी यांची देखील भागवतांनी भेट घेतली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारनं घेतलेल्या या निर्णयाची फार चर्चा होत आहे.

IPL_Entry_Point