मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Dumka Crime News : चेटकीण असल्याचं सांगत मूत्र पाजून दिले चटके, आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल

Dumka Crime News : चेटकीण असल्याचं सांगत मूत्र पाजून दिले चटके, आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 10:17 AM IST

Dumka Crime News : आरोपी महिलेनं चेटकीण असल्याचं सांगून अनेक दिवसांपासून तीन महिला आणि एका पुरुषाचा अमानवीय छळ चालवला होता. त्यानंतर आता या प्रकरणाचा भांडाफोड झाला आहे.

Dumka Jharkhand Crime News
Dumka Jharkhand Crime News (HT_PRINT)

Dumka Jharkhand Crime News : देशात सातत्यानं जादुटोणा विरोधी कार्यक्रम राबवले जातात. याशिवाय अनेक राज्यांमध्ये याविरोधात कायदा पारित केलेला आहे. परंतु अजूनही समाजाला लागलेली ही कीड संपलेली नाही. कारण झारखंडच्या दुमकामध्ये एका महिलेनं चेटकीण असल्याचं सांगून तीन महिला आणि एका पुरुषासोबत किळसवाणा प्रकार केल्यानं खळबळ उडाली आहे. आरोपी महिलेनं जादुटोणा येत असल्याचं सांगून एकाच कुटुंबातील चार जणांना तिचं मूत्र पाजून गरम गजाचे चटके दिल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील दुमका जिल्ह्यातल्या अस्वारी गावात ही घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी काही महिलांची आरोपी महिलेशी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख झाली. त्यात आरोपी महिलेनं इतरांना आपल्याला जादू येत असल्याचं सांगितलं. याशिवाय ती चेटकीण असल्याचंही इतर महिलांना सांगितलं. परंतु जेव्हा या तीनही महिला तिला भेटायला घरी आल्या तेव्हा आरोपी महिलेनं त्यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. आरोपीनं महिलांना ती चेटकीण असल्याचं सांगितल्यानं पीडित महिला घाबरलेल्या होत्या. त्यानंतर या महिलांच्या कुटुंबातील एका पुरुषाचाही आरोपी महिलेनं छळ केला.

मुत्र पाजून गरम चटके दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महिलांच्या नातेवाईकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं या प्रकरणात कारवाई करत जखमींना रुग्णालयात दाखल केलं. या घटनेनंतर आरोपी महिला फरार झालेली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेच्या कृत्यानं आणि धमकीनं पीडित आणि त्यांच्या कुटुंबातील लोक घाबरलेले होते. त्यामुळं अनेकदा अत्याचार झाल्यानंतरही त्यांनी पोलिसांकडे तक्रार केलेली नव्हती. त्यानंतर आता त्यांच्या परिचयाच्या व्यक्तीनं या प्रकरणात तक्रार केली असून आरोपी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता पोलिसांकडून फरार आरोपी महिलेचा शोध घेतला जात आहे.

IPL_Entry_Point

विभाग