मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maratah Aarkshan: ज्या फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं त्यांनीच मराठ्यांची झोळी भरली- तानाजी सावंत

Maratah Aarkshan: ज्या फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं त्यांनीच मराठ्यांची झोळी भरली- तानाजी सावंत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 26, 2022 09:15 AM IST

Shinde-Fadnavis Govt : राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेत्तृत्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि सहा महिन्यांत मराठा समाजाचं आरक्षण गेलं, असा आरोपही त्यांनी केला.

Shinde-Fadnavis Govt
Shinde-Fadnavis Govt (HT)

Shinde-Fadnavis Govt : सत्ताधारी शिंदे गटाकडून राज्यातील अनेक भागांमध्ये हिंदूगर्वगर्जना संवाद यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटाचे मंत्री विविध ठिकाणी सभा घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे हिंदूगर्वगर्जना यात्रेसाठी परभणीत आले असता त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत वादात सापडण्याची शक्यता आहे. कारण आता त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलताना एक मोठं वक्तव्य केलं आहे.

उस्मानाबादमध्ये आपल्या समर्थकांसमोर बोलताना तानाजी सावंत म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेहमी काही लोकांनी ते ब्राह्मण असण्यावरून हिणवलं. परंतु याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली, असं वक्तव्य सावंत यांनी केलं.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सावंत यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले की, २०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना विरोधकांनी प्रचंड त्रास दिला. मराठा क्रांती मोर्चा काढला, शिवसेनेनं या मोर्चाला मुका मोर्चा असं संबोधलं होतं. तेव्हा त्यांनी संपूर्ण मराठा समाजाचा अपमान केला होता. ज्या व्यक्तीला त्याच्या जातीवरून हिणवलं गेलं त्याच व्यक्तीनं मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलंही. त्यातून दोन ते तीन बॅचेस बाहेर आल्या. असंख्य तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, परंतु राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत आरक्षण गेलं, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

२०१९ मध्ये शिवसेनेनं बहुमताशी विश्वासघात केला. त्यामुळं मराठ्यांचं आरक्षण सहा महिन्यांतच गेलं. आम्ही मराठे हे मूर्ख आहोत की वेंधळे हेच आम्हाला कळत नाहीये. असं म्हणत तानाजी सावंतांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे.

IPL_Entry_Point