मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवरीसारखा वर्षा बंगला सोडला, आता मातोश्रीवर फक्त गोचिड जमा झालेत; भुमरेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप

नवरीसारखा वर्षा बंगला सोडला, आता मातोश्रीवर फक्त गोचिड जमा झालेत; भुमरेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 25, 2022 11:46 AM IST

Sandipan Bhumre : मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप मंत्री संदीपान भुमरेंनी केला आहे.

Sandipan Bhumre On Uddhav Thackeray
Sandipan Bhumre On Uddhav Thackeray (HT)

Sandipan Bhumre On Uddhav Thackeray : पक्षात बंड झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष पेटलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता इतर नेत्यांनीही थेट उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. आमदार सदा सरवणकर, रामदास कदम यांच्यानंतर आता मंत्री संदीपान भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत खोचक टीका केली आहे.

अमरावतीतील एका कार्यक्रमात बोलताना मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, एखादी नवरी घर सोडताना ज्या पद्धतीनं सोंग करते, तसंच सोंग ठाकरेंनी वर्षा बंगला सोडताना केलं. आम्ही भेटायला जायचो तेव्हा ते मास्क लावायचे. आता सरकार गेलं, खुर्ची गेली आणि मास्कही गेला. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ते फक्त टिव्हीवरच दिसायचे, असं म्हणत भुमरेंनी थेट ठाकरेंवर टिकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट असतानाही उद्धव ठाकरेंनी कोणत्याही जिल्ह्याचा दौरा केला नाही. कारण त्यांच्याकडे वेळच नव्हता. अशा मुख्यमंत्र्यांचा फायदा काय?, त्याचवेळी एकनाथ शिंदे हे राज्यात पायाला भिंगरी लावून फिरत होते. उद्धव ठाकरे जेव्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जाळ्यात अडकल्याचं आमच्या लक्षात आल्यानंतर आमच्यात चलबिचल सुरू झाली. त्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी तयार केल्याचाही खुलासा भुमरेंनी केला.

ठाकरेंच्या मातोश्रीवर काही गोचिड जमा झालेले आहेत. ते कोणत्याही फाईलीवर सह्या करत नव्हते. आता या गोचिडांना आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. मविआच्या स्थापनेला आमचा सुरुवातीपासूनच विरोध होता, परंतु तेव्हा आमचं कुणीही ऐकलं नाही, त्यामुळं माझ्यासहित सत्तेत असलेले मंत्री बाहेर पडले. कॅबिनेट मंत्री असूनही मी माझं पद धोक्यात घातलं. कारण आम्हाला बाळासाहेबांचे विचार वाचवायचे होते. आम्ही नाही तर उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केल्याचा आरोप भुमरेंनी केला आहे.

ज्यांनी कधीही गाद्या उचलल्या नाहीत, पक्षाचं काम केलं नाही, त्यांना मंत्रिपदं आणि पालकमंत्रीपदं देण्यात आली आणि आता आम्हाला गद्दार म्हटलं जात असल्याचा आरोप करत ४० आमदार आणि १२ खासदारांचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला.

IPL_Entry_Point