मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kidnapping Gang : राज्यात मुलं चोरणाऱ्या टोळीबद्दल अफवांना पेव; पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा

Kidnapping Gang : राज्यात मुलं चोरणाऱ्या टोळीबद्दल अफवांना पेव; पोलिसांनी दिला कारवाईचा इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 25, 2022 12:21 PM IST

Child Kidnapping Gang : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुलं चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत.

Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Child Kidnapping Gang In Maharashtra : मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात काही दिवसांपूर्वी मुलं चोरण्यात आल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याच्या अफवांना पेव फुटलं आहे. औरंगाबाद, जालना, बीड, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, मुंबई, नागपूर आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये सोशल मीडियावर अफवा पसरवणारे अनेक मेसेजेस व्हायरल होत असल्यानं पालक धास्तावलेले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणाची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आली असून पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पोलिसांनी पत्रक काढून नागरिकांना केलं आवाहन...

मुलं चोरणारी टोळी सक्रिय झाल्याच्या आशयाचे मेसेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्यानं व्हायरल होत असल्यानं आता पुणे आणि औरंगाबाद पोलिसांनी एक पत्रक काढून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन केलं आहे. याशिवाय ज्या खात्यांवरून फेक मेसेजेस पसरवले जात आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांनी याबाबत जारी केलेल्या पत्रकात पोलिसांनी राज्यात कोणतीही टोळी सक्रिय झाली नसल्याचं सांगितलं आहे. काही लोक सोशल मीडियावर अफवा पसरवत असून नागरिकांनी या अफवांना खतपाणी घालू नये, पालकांनी अशा अफवांपासून सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर मुल चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर या घटनेवरून राज्यात ही टोळी सक्रिय झाल्याची अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. पंढरपूरात मुलं चोरीच्या संशयातून यूपीतील काही साधुंना मारहाण करण्यात आल्याच्या घटनेनंतर अफवांना पेव फुटलं आहे. त्यामुळं आता पालकांमध्ये चिंतेचं वातावरण असून पोलिसांनी अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

अफवांमुळं घडल्या या घटना...

पंढरपूरात मुलं चोरी करण्यासाठी आलेली टोळी समजून साधुंना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर आता नाशिकमध्ये मित्राची मस्करी करण्यासाठी बुरखा घालून गेलेल्या एका व्यक्तीला मुलं चोरणारा आरोपी समजून जमावानं मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय जळगावात तोंडाला रुमाल बांधून रस्तावरून चालणाऱ्या एका महिलेवर लोकांनी हल्ला केला आहे.

IPL_Entry_Point