मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  शिक्षिका रागावली म्हणून चिमुकल्याचा वर्गात गोळीबार; घटनेनंतर मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांची धावपळ

शिक्षिका रागावली म्हणून चिमुकल्याचा वर्गात गोळीबार; घटनेनंतर मुख्याध्यापकांसह विद्यार्थ्यांची धावपळ

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 09, 2023 01:38 PM IST

Student Firing In School : गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून महिला शिक्षक रागावली होती. त्यानंतर चिमुकल्यानं थेट वर्गात शिक्षकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Student Firing On School Teacher In America
Student Firing On School Teacher In America (HT)

Student Firing On School Teacher In America : गृहपाठ पूर्ण न केल्यामुळं रागावलेल्या महिला शिक्षकावर चिमुकल्या विद्यार्थ्यानं थेट वर्गात गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये ही संतापजनक घटना घडली असून त्यामुळं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपी चिमुकल्याला अटक केली असून त्याच्याकडील पिस्तुल जप्त करण्यात आलं आहे. आरोपी चिमुकल्यानं वर्गात गोळीबार केल्यानं वर्गातील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याशिवाय या घटनेची माहिती समजताच पालकांनी मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी शाळेत मोठी गर्दी केली होती. पाल्यांना घरी नेल्यानंतर अनेक पालकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बीबीसीनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील व्हर्जिनियाच्या न्यूटन परिसरातील एका शाळेत गृहपाठ पूर्ण न केल्यामुळं विद्यार्थ्यावर महिला शिक्षक रागावली होती. त्यानंतर संतापलेल्या सहा वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्यानं दप्तरातून पिस्तूल काढून थेट शिक्षिकेवर गोळीबार केला. डाव्या खांद्याला गोळी लागल्यामुळं महिला शिक्षिका वर्गातच कोसळली. गोळीबाराचा आवाज झाल्यानंतर शाळेतील मुख्याध्यापक, कर्मचारी आणि इतर विद्यार्थ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमी शिक्षिकेला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपी विद्यार्थी हवेत गोळीबार करत असल्याचं दिसताच उपस्थितांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली.

मुख्याध्यापकांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी विद्यार्थ्याला अटक केली असून त्याच्याकडील पिस्तुलही जप्त केलं आहे. चिमुकल्यानं शाळेत बंदूक कशी काय आणली, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. याशिवाय या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शाळा प्रशासनाकडून नवे नियम जारी करण्यात येणार असल्याचं मुख्याध्यापकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. याशिवाय पोलिसांनी आरोपी चिमुकल्याला अटक केल्यानंतर त्याला बालसुधारगृहात पाठवलं असून त्याच्या पालकांना तपासासाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे.

IPL_Entry_Point