मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Narayana Murthy : मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदर, परंतु...', उद्योजक नारायण मूर्तींचं मोठं वक्तव्य

Narayana Murthy : मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदर, परंतु...', उद्योजक नारायण मूर्तींचं मोठं वक्तव्य

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 24, 2022 11:18 AM IST

Narayana Murthy On Ex PM Manmohan Singh : देशातील युवा पिढीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर झेप घेईल, असा विश्वास नारायण मूर्तींनी व्यक्त केला.

Narayana Murthy On Ex PM Manmohan Singh
Narayana Murthy On Ex PM Manmohan Singh (HT)

Narayana Murthy On Ex PM Manmohan Singh : प्रसिद्ध उद्योजक आणि इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि यूपीए सरकारच्या कारभारावर मोठं भाष्य केलं आहे. कॉंग्रेसप्रणित मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशाचा विकास ठप्प झाला, आर्थिक बाबींशी संबंधित निर्णय घेतले जात नव्हते, असं धक्कादायक वक्तव्य करत मूर्ती यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे.

मनमोहन सिंग यांच्याबद्दल आदर पण...

अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे असामान्य व्यक्ती आहेत. त्यांच्याद्दल प्रचंड आदर आहे. परंतु त्यांच्या कार्यकाळात आर्थिक बाबींसंदर्भात निर्णय घेतले जात नव्हते. त्यामुळंच सर्व गोष्टी घडत गेल्या, त्या का घडल्या, याबद्दल मला कल्पना नाही, असं वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे. याशिवाय युवा पिढीच्या जोरावर भारताची अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ शकते, आपण चीनचा स्पर्धक बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात बोलताना मूर्ती म्हणाले की, २००८ ते २०१२ या काळात मी एचएसबीसीच्या बोर्डावर कार्यरत होतो. त्यावेळी होणाऱ्या बैठकांमध्ये दोन-तीनदा चीनचा उल्लेख केला जायचा. परंतु भारताचं नाव केवळ एकदा घेतलं जायचं. मी जेव्हा २०१२ साली एचएसबीसी सोडली तेव्हा क्वचितच भारताचं नाव घेतलं जात होतं. परंतु त्यावेळच्या बैठकांमध्ये चीनचं नाव तब्बल तीस वेळा घेतलं जायचं, असं नारायण मूर्ती म्हणाले.

इतर कोणत्याही देशाचा उल्लेख होत असताना आणि त्यात विशेषत: चीनचा उल्लेख होत असेल तर त्यावेळी भारताचंही नाव घेतलं जायला हवं, आता ही जबाबदारी भारताच्या युवा पिढीची असल्याचं त्यांनी सांगितलं. यूपीएच्या २००४ आणि २००९ या दोन्ही टर्मची टीका केल्यानंतर त्यांनी १९९१ साली सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसच्या सरकारचं मात्र कौतुक केलं आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, १९९१ साली मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री होते, त्याकाळात मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा करण्यात आल्या, त्यानंतर एनडीएच्या सरकारनं सुरू केलेल्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘स्टार्ट अप इंडिया’ या योजनांमुळं भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लागत असल्याचं म्हणत मूर्ती यांनी मोदी सरकारचंही कौतुक केलं.

IPL_Entry_Point