मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ
7th Pay Commission Dearness Allowance
7th Pay Commission Dearness Allowance (HT)

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात होणार मोठी वाढ

05 February 2023, 15:33 ISTAtik Sikandar Shaikh

Dearness Allowance : येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

7th Pay Commission Dearness Allowance : कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं सातवं वेतन आयोग लागू केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात बंपर वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३८ टक्के इतका महागाई भत्ता दिला जातो. त्यात चार टक्क्यांची वाढ होऊन ४२ टक्क्यांपर्यंत महागाई भत्ता देण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

१ जानेवारी ते १ जुलै या दरम्यान महागाई भत्ता केंद्र सरकारकडून वाढवण्यात येत असतो. त्यामुळं येत्या काही महिन्यांत केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याच्या विचारात आहे. ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारावर कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता देण्यात येत असतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सीपीआय-आयडब्ल्यू जारी करण्यात आला होता. त्यामुळं येत्या काही महिन्यांमध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढवण्याचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडून सादर करण्यात येणार असून त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळानं त्याला मंजुर केलं तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार असल्याचं ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनी म्हटलं आहे.

ग्राहक किंमत निर्देशांक हा जानेवारी महिन्यापासून वर्षभराच्या आकडेवारीच्या तुलनेत निचांकी पातळीवर आलेला आहे. यंदा तो अंदाजे ५.७२ टक्के नोंदवण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई ५.८८ टक्के होती. तर डिसेंबर २०२२ मध्ये निर्देशांक स्थिर राहिला तर महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता थेट चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.