मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Pune Bypolls Election Mns President Raj Thackeray's Letter To All Parties Over Pune By-election

Pune Bypolls Election: पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राज ठाकरेंचं सर्वपक्षीयांना पत्र

Raj Thackeray
Raj Thackeray (Sandip Mahankal)
Ashwjeet Rajendra Jagtap • HT Marathi
Feb 05, 2023 11:13 AM IST

Raj Thackeray: पुण्यातील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वपक्षीयांना पत्राद्वारे आवाहन केले आहे.

Eknath Shinde On Pune Bypoll Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज ठाकरे शहर कार्यकारणीमधील नेत्यांची बैठक घेणार असल्याने पुण्यातील पोटनिवडणुकीबाबत मनसेची भूमिका काय असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, असे असताना राज ठाकरे यांनी पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यात यावी, यासाठी सर्वपक्षीयांना पत्र लिहिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

"महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होते तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, 'तसाच कील त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन इालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच अस नाही", असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहले आहे.

"अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या,त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचे आव्हान केलं होत. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यानी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली. आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वांना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाया पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात", असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या पत्रातून सर्वपक्षीयांना केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अजित पवार आणि जयंत पाटील यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

WhatsApp channel