मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jagadish Shettar : भाजप नेत्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत धावाधाव करायला लावणारे जगदीश शेट्टर आहेत कोण?

Jagadish Shettar : भाजप नेत्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत धावाधाव करायला लावणारे जगदीश शेट्टर आहेत कोण?

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 17, 2023 01:05 PM IST

Who is Jagadish Shettar : माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळं कर्नाटकातील राजकारण ढवळून निघालं आहे.

Jagadish Shettar
Jagadish Shettar

Karnataka Vidhan Sabha Poll 2023 : भारतीय जनता पक्षातील बंडाळीमुळं कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील चुरस अधिकच वाढली आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पक्षनेतृत्वाचा निर्णय झुगारत थेट काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं राजकारण ढवळून निघालं आहे. शेट्टर यांच्या या पवित्र्यामुळं भाजपमध्ये धावाधाव सुरू झाली आहे. संपूर्ण राज्यात शेट्टर यांचीच चर्चा आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे धक्कातंत्रासाठी ओळखले जातात. देशातील अनेक राज्यांत दिग्गजांना तिकिटं नाकारण्यापासून संख्येच्या दृष्टीनं कमी असलेल्या समाजीतील नेत्याला मुख्यमंत्री करण्यासारखे अनेक निर्णय त्यांनी घेतले आहे. मात्र, कर्नाटकात मोदी-शहांचे हे निर्णय फसले आहेत. येडियुरप्पा यांना राजकारणातून निवृत्त करण्याचा निर्णय असाच मागे घ्यावा लागला होता. आता सुद्धा दिग्गजांना घरी बसवण्याचा त्यांचा निर्णय पक्षाच्या अंगलट आला आहे. शेट्टर यांचा काँग्रेस प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Karnataka Poll : माजी मुख्यमंत्रीच काँग्रेसमध्ये गेले! भाजप कोणाच्या भरवशावर निवडणूक लढणार?

शेट्टर हे २०१२ ते २०१३ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. शेट्टर हे सलग सहा वेळी हुबळी-धारवाड मतदारसंघातून निवडून आले आहेत. २०१८ मध्ये त्यांना ७५,७९४ मतं मिळाली होती. प्रत्येक वेळी ते २५ हजारांहून अधिक मतांच्या फरकानं विजयी होत आहेत. १९५५ मध्ये जन्मलेल्या शेट्टर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही सक्रिय भूमिका बजावली आहे. ते कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि अनेक सरकारांमध्ये मंत्रीही राहिले आहेत. २००५ मध्ये ते कर्नाटक भाजपचे अध्यक्षही होते. २००८ मध्ये त्यांनी विधानसभेचं सभापती पद भूषवलं होतं. या पदावर त्यांची बिनविरोध निवड झाली होती.

२०१८ मध्ये काय झालं होतं?

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं २२४ जागांच्या कर्नाटक विधानसभेत एकूण १०४ जागा जिंकल्या. त्यांना एकूण ३६.३५ टक्के मतं मिळाली, तर काँग्रेसला ३८.१४ टक्के मतं मिळाली. मात्र, त्यांना केवळ ८० जागा जिंकता आल्या. तिसर्‍या क्रमांकावर असलेल्या जेडीएसला १८.३ टक्के मते आणि ३७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर काँग्रेस व जेडीएसनं एकत्र येऊन सरकार स्थापलं होतं. भाजपनं काँग्रेसच्या आमदारांना फूस लावून हे सरकार उलथवलं होतं.

Maharashtra Politics : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीला खिंडार?; अमित शहांच्या दौऱ्यामुळं चर्चेला उधाण

शेट्टर यांचा बालेकिल्ला असलेल्या धारवाड जिल्ह्यात भाजपनं सहापैकी चार जागा जिंकल्या होत्या. अवघ्या दोन जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यातील एक जागा भाजपला केवळ ६३४ मतांच्या फरकानं गमवावी लागली होती. याशिवाय शेट्टर यांचं प्रभावक्षेत्र असलेल्या आसपासच्या भागातही भाजपनं बहुतांश जागा जिंकल्या होत्या. त्यामुळंच शेट्टर यांनी पक्ष सोडणं भाजपसाठी अडचणीचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग