मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यासाठी देशातील पहिला विना गिट्टीचा रेल्वे ट्रॅक तयार केला जात आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्स वर या प्रोजेक्टबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांनी या कामाची माहितीही दिली आहे. वैष्णव यांनी सांगितले की,२९५किमी पियर आणि १५३किमी. चे वायाडक्टचे काम आधीच पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर त्यांनी म्हटले की, मोदी३.० मध्ये आणखी खूप काम होणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉरवर बुलेट ट्रेनसाठी भारतात पहिल्यांदाच स्पेशल ट्रॅक सिस्टम तयार केली जात आहे. या खडीचा वापर केला जाणार नाही. हेजे-स्लॅब बॅलेस्टलेस ट्रॅक सिस्टम आहे. या ट्रॅक सिस्टमचे मुख्यरित्या ४ भाग आहेत. त्यामध्ये आरसी ट्रॅक बेड, सिमेंट मोर्टार, प्रीकास्ट ट्रॅक स्लॅब आणि रेल्वे विथ फास्टनर्स आदिचा समावेश आहे. प्री-कास्ट आरसी ट्रॅक स्लॅबचे निर्माण देशातील दोन शहरात केले जात आहे. हे काम गुजरातमधील आनंद आणि किम येथे काम सुरू आहे. ट्रॅक निर्माणचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही ट्रॅक सिस्टम अद्भूत इंजिनियरिंगचे उदाहरण आहे. तसेच हे मेक इन इंडियाचे उदाहरण सादर करते.
हवेची गती मोजण्यासाठी लागणार एनीमोमीटर -
या हायस्पीड ट्रेनला जोरदार वारे व वादळापासून नुकसान होऊ नये, यासाठी पाऊले उचलली जात आहे. यासाठी ५०८ किलोमीटरच्या मार्गावर १४ ठिकाणी हवेची गती मोजण्यासाठी एनीमोमीटर लावले जातील. राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे लिमिटेडने सांगितले की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉर देशाच्या पश्चिम किनारपट्टीवरून जात आहे. येथे हवेची गती अधिक असते. या हवेमुळे पुलांवरून ट्रेन जाताना काही नुकसान होऊ शकते. यावर उपाय म्हणून वायाडक्टवर एनीमोमीटर लावले जातील. हे उपकरण गुजरातमधील ९ तर महाराष्ट्रात ५ ठिकाणी लावले जाईल. हे उपकरण हवेच्या गतीचे मॉनिटरिंग करतील.