Scotland Viral News : सध्याच्या काळात वीजनिर्मिती करण्यासाठी भारतासह जगभरात नवे पर्याय शोधले जात आहेत. नवनव्या प्रयोगांतून वीज निर्माण करत कोळशाचा वापर कमी करण्यात येत आहे. परंतु आता युरोपमधील एका क्लबने वीजनिर्मितीसाठी एक लोकप्रिय फंडा शोधून काढला आहे. क्लबमध्ये नाचणाऱ्या तरुणाईच्या उष्णतेपासून वीजनिर्मिती केली जात असून त्याद्वारे क्लबमधील वीजेची गरज भागवली जात आहे. त्यामुळं आता या नव्या प्रयोगाची संपूर्ण युरोपसह जगभरात चर्चा होत आहे. स्कॉटलंडमधील एजीथ्री डब्यू या क्लबमध्ये नाचणाऱ्या तरुणाईच्या उष्णतेपासून वीज तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षभरापासून स्कॉटलंडमधील एजीथ्री डब्यू या क्लबमध्ये नाचणाऱ्या तरुणाईतील उष्णतेपासून वीजनिर्मिती केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेला बॉडी हिट असं नाव देण्यात आलं असून त्याद्वारे प्रत्येक नाचणारा व्यक्ती १४० ते १५० व्हॅट वीजनिर्मिती करत आहे. त्यामुळं आता नाचता-नाचता पर्यावरणाची हानी रोखत वीज निर्माण होत असल्यामुळं या नव्या प्रयोगाबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे. याशिवाय अशा प्रकारच्या प्रयोगाच्या माध्यमातून वीजनिर्मितीचा नवा फंडा मिळाल्यानं त्याचा वापर अनेक ठिकाणी होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
नाचणाऱ्या तरुणाईच्या उष्णतेपासून वीजननिर्मिती करणाऱ्या एजीथ्री डब्यू क्लबचे मॅनेजर बॉब जवाहिरी यांनी बोलताना म्हटलं की, आम्ही म्यूझिक इव्हेंट्सच्या माध्यमातून वीज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्बन फूट प्रिंटला कमी करून वीज आणि गॅसचा वापर कमी करण्यासाठीच आम्ही हा नवा फंडा शोधून काढल्याचं क्लब मालकानं म्हटलं आहे.
कशी तयार होते वीज?
जेव्हा क्लबमध्ये तरुणाई जल्लोषात डान्स करत असते, त्यावेळी तिथे लागलेले व्हेंटिलेटर्स त्यांच्या शरीरातील उष्णता कॅप्चर करतात. त्यानंतर एका पाईपद्वारे ती गरम हवा सुरक्षित यार्डात पोहचवली जाते. त्यानंतर जमीनीखाली दोनशे मीटर खोल खड्ड्यात या उष्णतेवर प्रक्रिया करून त्याद्वारे वीजनिर्मिती केली जाते. ही प्रक्रिया केवळ एका मिनिटांच्या आत पूर्ण होते. या प्रकल्पाला तयार करण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागल्याचंही जवाहिरी यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या