मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Zika Virus Case : कर्नाटकात चिमुकलीला झिका व्हायरसची लागण; आरोग्य विभाग अलर्टवर

Zika Virus Case : कर्नाटकात चिमुकलीला झिका व्हायरसची लागण; आरोग्य विभाग अलर्टवर

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 13, 2022 09:45 AM IST

Zika Virus Case : काही दिवसांपूर्वी पुण्यात झिका व्हायरसची लागण झालेला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आता कर्नाटकात पहिल्यांदाच झिकाचा रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

Zika Virus Case in Karnataka
Zika Virus Case in Karnataka (AP)

Zika Virus Case in Karnataka : गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण जगाला हैराण करून सोडलेल्या कोरोना महामारीचा अंत होत असतानाच आता झिका या नव्या आजारानं आणि घातक व्हायरसनं लोकांची डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुण्यात झिकाचा रुग्ण आढळला होता. त्यानंतर आता कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात एका पाच वर्षीय चिमुकलीला झिका व्हायरसची लक्षणं आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे.

काही दिवसांपूर्वी रायचूर जिल्ह्यातील एका चिमुकलीला ताप आणि खोकल्याचा त्रास झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिच्या रक्ताचे नमुने पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर तिला झिका या घातक व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानंतर कर्नाटकातील आरोग्य विभागानं अलर्ट जारी केला असून आवश्यक खबरदारी बाळगण्यास सुरुवात केली आहे. व्हायरसनं बाधित चिमुकलीची प्रकृती स्थिर असून चिंतेचं कोणतंही कारण नसल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. परंतु त्यानंतर आता राज्यातील आरोग्ययंत्रणा सतर्क झाली असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना सर्व रुग्णालय प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कर्नाटक सरकार लवकरच नव्या गाईडलाईन्स जारी करण्याची शक्यता आहे.

झिका व्हायरसनं बाधित झालेल्या चिमुकलीनं बाहेरच्या देशात प्रवास केलेला नसून ती एकमेव केस असल्याचं मंत्री सुधाकर यांनी सांगितलं आहे. याशिवाय सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असून स्थिती हाताळण्यासाठी सरकार सक्षम असल्याचंही आरोग्य मंत्री के सुधाकर म्हणाले. दरम्यान १६ नोव्हेंबर रोजी पुण्यात एक व्यक्ती ताप, खोकला आणि सांधेदुखीची लक्षणं जाणवल्यानंतर जहांगीर रुग्णालयात उपचारासाठी आला होता. त्यानंतर त्याला झिका व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. त्यानंतर आता कर्नाटकातही झिका व्हायरसचा रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point