मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Bandh : आज पुणे बंद; अनेक संघटना होणार सहभागी; तब्बल सात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Pune Bandh : आज पुणे बंद; अनेक संघटना होणार सहभागी; तब्बल सात हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 13, 2022 10:20 AM IST

Pune Bandh news : राज्यपाल यांचा व्यक्तव्याचा निषेध करण्यासाठी तसेच त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यात आज मंगळवारी कडकडीत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. यात अनेक संघटना आणि पक्ष सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

पुण्यात आज कडकडीत बंद
पुण्यात आज कडकडीत बंद

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी आज मंगळवारी (दि १३) पुण्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. या बंद मध्ये सर्व संघटना आणि काही पक्ष सहभागी होणार आहे. राज्यपाल यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जाणार आहे. सकाळी गुडलक चौकात आंदोलन देखील करण्यात येणार आहे. बंद संदर्भात सर्व पक्षीय संघटनांची बैठक बुधवारी एसएसपीएमएस शाळेच्या मैदानात पार पडली होती. यावेळी पुणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बंद मध्ये सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहे. मार्केटयार्ड देखील बंद राहणार असल्याने भाजीपाल्याची आवक देखील रखडणार आहे. याचा परिणाम भावावर होण्याची शक्यता आहे.

खासगी शाळेचे बस चालक देखील आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांअभावी शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यात काही परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना या बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यात उद्या चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुणे बंदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. वाहनचालकांनी पर्य़ायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे.

याबाबत संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी संतोष शिंदे म्हणाले, पुणे बंदचा निर्णय हा सर्व पक्षांनी एकत्रितरित्या घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल यांनी महत्वपूर्ण पदावर असताना बेजाबदार वक्तव्य करणे चुकीचे होते. त्याबाबत अद्याप त्यांनी माफी मागितलेली नाही. त्यामुळे राज्यपालांची हकालपट्टी करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. या बंद मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना उध्दव ठाकरे गटासह विविध संघटना सहभागी होणार आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेळोवेळी अवमान केल्याच्या निषेधार्थ पुणे बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन महासंघाला करण्यात आले. पुणे बंदमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी महासंघाने बंदला पाठिंबा दिल्यानंतर अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितिने पुणे बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याचे समितीचे समन्वयक संतोष नांगरे यांनी माहिती दिली.

 

तब्बल १०० अधिकारी अन १ हजार पोलिस कर्मचारी तैनात

पुण्यात उद्या होणाऱ्या बंदच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पुण्यात उद्या १०० अधिकारी आणि एक हजारांवर कर्मचारी, साध्या वेशातील कर्मचारी, विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंदमध्ये सहभागी होणार्‍यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे. पुणे बंदमध्ये सर्वपक्षीय सहभाग घेण्यात आला आहे. मंगळवारी डेक्कन ते लालमहल चौकापर्यंत मुकमोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे परिमंडळ एकमध्ये पोलिसांनी ५० अधिकारी आणि ३५० कर्मचारी नियुक्त केले आहेत. त्याशिवाय संबंधित पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारीही बंदोबस्ताला तैनात करण्यात आले आहेत. गुन्हे शाखा, मुख्यालय, विविध पथकातील ५० अधिकारी आणि ६०० ते ६५० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याशिवाय साध्या वेशातील कर्मचारी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग