Karnataka Vidhan Sabha Election : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सध्या सध्या सत्ताधारी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आघाडी उघडली असतानाच कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या १० मे रोजी कर्नाटकमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यातील सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा केली. कर्नाटक विधानसभेत २२४ जागा आहेत. सध्या तिथं भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. त्याशिवाय, काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल हे प्रमुख पक्ष आहेत. आगामी निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे.
याआधी २०१८ साली कर्नाटकात विधानसभा निवडणूक झाली होती. निकालानंतर तिथं काँग्रेस व जेडीएस युतीचं सरकार आलं. मात्र, नंतर भाजपनं काही आमदार गळाला लावून हे सरकार पाडलं आणि सरकार स्थापन केलं. सध्या विधानसभेत भाजपचे १२१ आमदार आहेत. काँग्रेसचे ७० तर, जेडीएसचे ३० आमदार आहेत.
काँग्रेसची भिस्त कोणावर?
कर्नाटक हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र सध्या भाजपची सत्ता आहे. भाजपला शह देऊन कर्नाटकात पुन्हा सत्ता पटकावण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसची भिस्त माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आहे. ते मुख्यमंत्रिपदाचे सर्वात प्रबळ दावेदार आहेत. तसंच, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व वजनदार नेते डीके शिवकुमार यांचंही नाव चर्चेत आहे. काँग्रेसनं नुकतीच १२४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
भाजपची कसोटी
देशात दोन वेळा पूर्ण बहुमतानं सत्ता मिळवणाऱ्या भाजपला अद्यापही दक्षिण भारतातील राज्यात शिरकाव करता आलेला नाही. कर्नाटक हा त्यास अपवाद आहे. त्यामुळं हे राज्य कोणत्याही परिस्थितीत टिकवणं भाजपसाठी महत्त्वाचं आहे. या निवडणुकीचा निकाल २०२४ च्या लोकसभेच्या दृष्टीनंही महत्त्वाचा ठरणार आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर भाजपची भिस्त आहे.
संबंधित बातम्या