Mohammed Faizal : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावरून देशभरात गदारोळ सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैसल यांना सभागृहाचं सदस्यत्व पुन्हा बहाल करण्यात आलं आहे. तसं पत्र खुद्द लोकसभा सचिवालयानं फैसल यांना दिलं आहे.
खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात न्यायालयानं १० वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर लोकसभा सचिवालयानं ११ जानेवारी रोजी फैसल यांचं सदस्यत्व रद्द केलं होतं. १३ जानेवारी रोजी त्याची अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, केरळ उच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्यामुळं नियमानुसार त्यांचं सदस्यत्व पुन्हा बहाल करणं गरजेचं होतं. तसं न झाल्यानं फैसल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच लोकसभा सचिवालयानं आपली चूक सुधारत त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल केलं आहे.
कोणत्या प्रकरणात आरोप आहेत मोहम्मद फैसल?
२००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काळात मोहम्मद फैसल आणि त्यांच्या समर्थकांनी दिवंगत केंद्रीय मंत्री पी. एम. सईद यांचे जावई मोहम्मत सालेह यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी त्यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. स्थानिक न्यायालयानं फैसल यांच्यासह अन्य ३ जणांना १० वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. त्या आधारे लोकसभा सचिवालयानं त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं होतं. केरळ उच्च न्यायालयानं या शिक्षेला स्थगिती देऊन दोन महिने उलटल्यानंतरही त्यांना पुन्हा सदस्यत्व बहाल करण्यात आलं नव्हतं. त्या विरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर काल सुनावणी झाली. पुढील सुनावणी आज होणार होती. त्याआधीच हा निर्णय आला आहे.
संबंधित बातम्या