Sharad Pawar On Rahul Gandhi Live : गेल्या काही दिवसांपासून विनायक दामोदर सावरकर यांच्यावरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात राजकीय वादंग पेटलेलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावरून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटानं काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांना इशारा दिला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करत राहुल गांधी यांना सुनावलं आहे. सावरकर यांना माफीवीर म्हणणं योग्य नाही, असं म्हणत पवारांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहे. दिल्लीत काँग्रेससह विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी थेट भूमिका घेतली आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या प्रकरणानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उपस्थित होते. बैठकीत बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांचा काहीही संबंध नाहीये. त्यामुळं सावरकरांना माफीवीर म्हणणं योग्य नाही. सावरकरांचा मुद्दा सोडला तर अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत, त्यावर चर्चा करायला हवी, असं म्हणत शरद पवारांनी काँग्रेसच्या बैठकीतच राहुल गांधींना समोरा-समोर खडसावलं आहे.
काँग्रेसच्या बैठकीला ठाकरेंच्या खासदारांची दांडी...
संसद परिसरात मोदी सरकारविरोधात आंदोलन केल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. त्यावेळी देशातील १७ पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली. परंतु ठाकरे गटाचे खासदार या बैठकीला उपस्थित नव्हते. सावरकरांच्या मुद्द्यावरून मालेगावमधील सभेतून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला होता. त्यामुळं आता शिवसेना आणि काँग्रेसमधील या वादामुळं महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांचे कान टोचल्यामुळं या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या