मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Assam : मुख्यमंत्र्यांसह जग्गी वासुदेवांच्या नाइट सफारीवरून वाद पेटला; पोलिसांत तक्रार दाखल

Assam : मुख्यमंत्र्यांसह जग्गी वासुदेवांच्या नाइट सफारीवरून वाद पेटला; पोलिसांत तक्रार दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 27, 2022 09:54 AM IST

CM Himanta Biswa Sarma : नेहमीच आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं चर्चेत असणारे आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा आता नव्या वादात सापडले आहेत. कारण काझीरंगा पार्कमध्ये नाइट सफारी केल्यावरून त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Kaziranga National Park Assam
Kaziranga National Park Assam (HT)

Kaziranga National Park Assam : आपल्या वादग्रस्त आणि बिनधास्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असणारे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आता एका नव्या वादात सापडले आहेत. कारण शर्मा यांनी सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यासह रात्रीच्या वेळी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये सफारी केल्यावरून वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री हेमंत विस्वा शर्मा आणि सद्गुरु जग्गी वासुदेव हे रात्रीच्या अंधारात काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये फिरायला गेले होते. त्यावेळी त्यांनी पार्कची पाहणीही केली. परंतु त्याचे काही फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळं रात्रीच्या वेळी इतक्या फौजफाट्यासह काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जाण्याची काय गरज होती? किंवा कोणत्या प्राण्याला त्रास झाला असता किंवा प्राण्यानं हल्ला केला असता तर यासाठी कोण जबाबदार ठरलं असतं?, असे सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते सोनेश्वर नाराह आणि प्रबीन पेगू यांनी मुख्यमंत्री शर्मांविरोधात प्राणी संरक्षण कायदा (१९७२) नुसार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रात्रीच्या वेळी पार्कमध्ये सफारी करण्यावर बंदी घातलेली असतानाही मुख्यमंत्र्यांनी सफारी कशी केली असाही सवाल आता उपस्थित होत आहे.

आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्क हा एकशिंगी गेंड्यासाठी संरक्षित करण्यात आला आहे. तिथं त्यांचं संगोपन आणि पालनपोषण करण्यात येतं. या पार्कमध्ये फिरण्याची एक निश्चित वेळ ठरवण्यात आलेली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून जंगल सफारी केल्यानं आता त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आम्ही कुठलाही नियम मोडला नाही- मुख्यमंत्री शर्मा

या सगळ्या प्रकारावर बोलताना मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा म्हणाले की, आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही. वार्डन रात्रीच्या वेळी देखील काही लोकांना जंगल सफारी करण्याची परवानगी देऊ शकतो. आम्ही आसाममधील पर्यटनाला चालना देण्यासाठीच सफारी केल्याचं मुख्यमंत्री शर्मा म्हणाले.

ईशा फाउंडेशनचं स्पष्टीकरण...

या जंगल सफारीवेळी मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांच्यासोबत सद्गुरु जग्गी वासुदेव हे देखील होते. त्यामुळं त्यांच्यावरही नियम मोडल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर आता त्यांच्या ईशा फाऊंडेशननं या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. आसाम सरकारकडून सद्गुरु जग्गी वासुदेव यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की त्या नाइट सफारीची परवानगी आसाम सरकारनं घेतलेली असेल, असं ईशा फाऊंडेशननं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

IPL_Entry_Point