काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनीराहुल गांधी यांच्या'भारत जोडो न्याय यात्रे 'ची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, न्याय यात्रा ६७०० किमी अंतर कापणार आहे. मणिपूरचा मुद्दा उपस्थित करताना खर्गे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी जातात मात्र ते मणिपूरला का जात नाहीत?
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना खर्गे यांनी म्हटले की, मणिपूरमध्ये खूपच दुर्दैवी घटना घडली व घडत राहिली. मात्र मोदी कधी समुद्रकिनारी जाऊन स्विमिंग करत फोटोसेशन करतात तर कधी निर्माणाधीन मंदिरात तेथे फोटो काढतात. कधी केरळला जाऊन फोटो काढतात तर कधी मुंबईत. प्रत्येक ठिकाणी जाऊन नवनवीन वस्त्रे परिधान करून फोटो काढतात. मात्र हे महापुरुष मणिपूरला का जात नाहीत. तेथे लोक मरत आहेत. महिलांवर बलात्कार केला जात आहे. लोक थंडीने मरत आहेत. त्यांची विचारपूस करायला कधी जात नाहीत. काय ते देशाचा भाग नाहीत का? तुम्ही लक्षदीपला जाऊन पाण्यात पोहता, तर मणिपूरला जाऊन लोकांना समजावत का नाही?
काँग्रेस अध्यक्षखर्गे यांनी आज 'भारत जोडो न्याय यात्रे' च्या लोगोचे प्रकाशन केले. यावेळी खर्गे म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रा हे देशवासीयांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक मजबूत पाऊल आहे.
आम्ही भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून लोकांमध्ये जात आहोत जेणेकरून आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकता येईल आणि आमचे विचार मांडता येतील.राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. विशेष बाब म्हणजे राहुल गांधींनी काढलेल्या या यात्रेची सुरुवात मणिपूरची राजधानी इंफाळ येथून होणार आहे.