मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Bhopal Gas Leak : भोपाळमध्ये गॅसगळतीच्या घटनेनं खळबळ; १९८४ च्या पुनरावृत्तीनं लोक हादरले!

Bhopal Gas Leak : भोपाळमध्ये गॅसगळतीच्या घटनेनं खळबळ; १९८४ च्या पुनरावृत्तीनं लोक हादरले!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 27, 2022 12:11 PM IST

Chlorine Gas Leak : भोपाळमध्ये गॅस लीक झाल्यामुळं अनेक लोकांना श्वास घ्यायला त्रास होण्यासह डोळ्यात जळजळ व्हायला सुरुवात झाल्यानं खळबळ उडाली आहे.

Chlorine Gas Leak In Bhopal
Chlorine Gas Leak In Bhopal (HT)

Chlorine Gas Leak In Bhopal : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पुन्हा एकदा गॅसगळतीची घटना समोर आली आहे. त्यामुळं खळबळ उडाली असून लोकांना श्वास घेण्यास आणि डोळ्यात जळजळ व्हायला सुरुवात झाल्यानंतर शहरातील लोकांनी घराबाहेर पळ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. भोपाळच्या मदर इंडिया कॉलनीत ही घटना घडली असून क्लोरिनच्या गळतीमुळं ही भयानक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनं १९८४ साली भोपाळमध्ये घडलेल्या गॅसगळतीच्या महाभयंकर घटनेची आठवण लोकांना झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील मदर इंडिया कॉलनीसह परिसरात लोकांना अचानक श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळं लोकांनी याची माहिती तात्काळ पोलिसांना आणि प्रशासनाला दिली. त्यानंतर भोपाळ पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली आहे. या घटनेत तीन जणांना अधिक त्रास झाल्यानं त्यांना शहरातील हमिदीया रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं काय झालं?

भोपाळमध्ये एका कॉलनीत वॉटर फिल्टर प्लांटमधून क्लोरिन या घातक गॅसची गळती होत होती. प्लांटमधील तब्बल ९०० गॅस सिलिंडरचे नोजल खराब झाल्यानं ही घटना घडल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं क्रेनच्या सहाय्यानं हे गॅस सिलिंडर पाण्यात टाकले. याशिवाय गॅसगळती थांबवण्यासाठी कॉस्टिक सोड्याचाही वापर करण्यात आला. त्यानंतर भोपाळ महापालिकेनं शहरातील सर्व भागांचा पाणीपुरवठा बंद केल्याची माहिती दिली आहे.

लोकांना १९८४ च्या महाभयंकर घटनेची आठवण...

डिसेंबर १९८४ मध्ये भोपाळमधील एका विदेशी कंपनीतून विषारी गॅसची गळती झाल्यानं शहरात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय हजारोंच्या संख्येनं गुरं मृत्यूमुखी पडली होती. त्यामुळं अचानक घडलेल्या या घटनेनं भोपाळ शहरात खळबळ उडाली असून १९८४ च्या घटनेची पुनरावृत्ती झाल्यानं लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

IPL_Entry_Point

विभाग