MP, Rajasthan, Chhattisgarh survey: तेलंगणा, मिझोराम, मध्य प्रदेशमध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये देखील विधानसभा निवडणुका होत आहे. या सर्व राज्यांच्या निवडणुका चुरशीच्या होणार आहे. या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असून संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकांकडे लागून आहेत. या निवडणुका पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या सेमीफायनल मानल्या जात आहेत. अशा स्थितीत एक निवडणूक पूर्व सर्वेक्षण पुढे आले आहे. यात धक्कादायक खुलासा झाला आहे.
मध्य प्रदेशात सध्या भाजपचे सरकार आहे. मध्यप्रदेशांत विधानसभेच्या एकूण २३० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी ११६ चा जादुई आकडा गाठवा लागणार आहे. दरम्यान, सी व्होटरने केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणात या ठिकाणी काँग्रेस सरकार स्थापन करू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्यप्रदेशत काँग्रेसला २३० पैकी ११८ ते १३० जागा मिळू शकतात तर भाजपला ९९ ते १११ जागा मिळू शकतात. तर इतरांना ० ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसला ४४ टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला ४२ टक्के आणि इतरांना १४ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. या ठिकाणी विधानसभेच्या एकूण २०० जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला १०१ हा जादुई आकडा गाठवा लागणार आहे. सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये भाजप सरकार स्थापन करू शकते. सर्वेक्षणानुसार, भाजपला २०० जागांपैकी ११४ ते १२४ जागा मिळू शकतात. तर तर काँग्रेसला ६७ ते ७७ तर इतर पक्षांना ५ ते १३ जागा मिळू शकतात. राजस्थानमध्ये भाजपला ४५ टक्के मते मिळू शकतात. तर काँग्रेसला ४२ टक्के आणि इतरांना १३ टक्के मते मिळू शकतात असे सर्वेक्षणात पुढे आले आहे.
छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला ४६ चा जादुई आकडा गाठवा लागणार आहे. सर्वेक्षणानुसार राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होऊ शकते. सर्वेक्षणानुसार, काँग्रेस ९० जागांपैकी ४५ ते ५१ जागा काबीज करू शकते. तर भाजपला ३६ ते ४२ जागा आणि इतरांना २ ते ५ जागा मिळू शकतात. राज्यात काँग्रेसला ४५ टक्के मते मिळू शकतात. तर भाजपला ४३ टक्के आणि इतरांना १२ टक्के मते मिळू शकतात.
सर्वेक्षणानुसार भाजपला तीनपैकी केवळ एका राज्यात विजय मिळतांना दिसत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर आहे. छत्तीसगडमध्येही काँग्रेस सरकार निवडणुका जिंकू शकते. फक्त राजस्थानमध्ये भाजप सत्ता काबिज करू शकेल अशी अवस्था आहे.
संबंधित बातम्या