Curfew Imposed In Uttarakhand: उत्तराखंडमधील हलद्वानी जिल्ह्यातील बनभुलपुरा भागात बांधण्यात आलेल्या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी आलेल्या सरकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, जवळपास २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले असून परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इंटरनेट सेवासह शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारी अधिकारी आणि पोलीस कर्मचारी अनधिकृत मदरशावर कारवाई करण्यासाठी पोहोचले. परंतु, तिथे काही समाजकंटकांनी महापालिकेचे अधिकारी, पोलीस आणि पत्रकारांवर दगडफेक केली. यात अनेक पोलीस, महापालिका अधिकारी आणि पत्रकार जखमी झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या सोडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. परंतु, अश्रूधुराच्या नळकांड्या सोडल्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि या भागात मोठा हिंचासार उसळला.
हलद्वानी परिसरात तत्काळ संचारबंदी लागू करण्यात आली. तसेच सर्व शाळा शुक्रवारी (०९ फेब्रुवारी २०२४) दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय, काल रात्री नऊ वाजल्यापासून परिसरातील इंटरनेटसेवाही खंडीत करण्यात आली आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी रात्री उशिरा उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत धामी यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस आणि इंटेलिजन्सच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. "बनभुलपुरा भागात घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत प्रशासनाला गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उत्तराखंडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या कोणत्याही दंगलखोरांना सोडले जाणार नाही", असाही पुष्कर धामी इशारा दिला आहे.
संबंधित बातम्या