मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rajya Sabha : कोण आहेत अजित गोपछडे व मेधा कुलकर्णी? ज्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Rajya Sabha : कोण आहेत अजित गोपछडे व मेधा कुलकर्णी? ज्यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 14, 2024 05:57 PM IST

Rajya sabha Election Bjp candidate : भाजपने राज्यसभेसाठी अशोक चव्हाण, अजित गोपछडे व मेधा कुलकर्णी यांना संधी दिली आहे. जाणून घेऊया भाजपने संधी दिलेले गोपछडे व मेधा कुलकर्णी कोण आहेत.

ajit gopchade and Medha Kulkarni 
ajit gopchade and Medha Kulkarni 

राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवार जाहीर केले आहेत. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण,माजी आमदार मेधा कुलकर्णी व डॉ. अजित गोपछडे यांना पक्षानं संधी दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पक्षानं त्यांची नाराजी दूर केली आहे. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांना मतदारसंघ सोडावा लागला होता. त्यामुळं त्या नाराज होत्या. भाजपचा पाठीराखा असलेल्या ब्राह्मण मतदारांमध्येही नाराजी होती. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर संधी देऊन पक्षानं ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कारसेवक ते बालरोगतज्ज्ञ गोपछडे यांना निष्ठेचे फळ -

बालरोगतज्ज्ञ डॉ. अजित गोपछडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालकही आहेत. नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसंच नायगाव विधानसभेसाठी नेहमीच चर्चेत राहिलेल्या डॉ. गोपछडे यांना अखेर राज्यसभेवर संधी मिळाली आहे. जी-२० परिषदेच्या महाराष्ट्र भाजपच्या कार्यक्रम समितीत डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

डॉ.  गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता. बिलोली) असून त्यांचे वडील प्रा. माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत. गोपछडे यांच्या पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ. गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले.

चंद्रकांत पाटलांसाठी मतदारसंघ सोडणाऱ्या मेधा कुलकर्णी कोण?

मेधा कुलकर्णी यांनी १९९४ मध्ये पुणे विद्यापीठातून M.Ed ही पदवी मिळवली आहे. मेधा कुलकर्णी यांचे वडील गोवा मुक्ती संग्रामामध्ये स्वातंत्र्य सैनिक म्हणून सहभागी झाले होते.राजकीय करिअरची सुरुवात भाजपच्या पुणे शहराच्या महिला मोर्चा पदाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर २००२ मध्ये त्यांना पुणे महापालिकेच्या नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर २००२, २००७ आणि २०१२ असे सलग तीन वेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केले.

२०१४ मध्ये मेधा कुलकर्णी यांना आमदारकीसाठी तिकीट मिळाले. पाच वर्षे त्यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र २०१९ मध्ये मेधा कुलकर्णी यांना भाजपने तिकीट नाकारले  व चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून त्या नाराज असल्याचे बोलले जात होते.

 

मेधा कुलकर्णी यांचे पती विश्राम हे व्यावसायिकअसून त्यांनी एम. के. असोसिएट नावाची कंपनी आहे.त्यांची कंपनी अॅल्युमिनियम व्यवसायाशी निगडीत आहे.

IPL_Entry_Point