मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane BJP Office : ठाण्यातील भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात आरोपींवर गुन्हा

Thane BJP Office : ठाण्यातील भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात आरोपींवर गुन्हा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 01:28 PM IST

Thane BJP Office : पहाटे पाच वाजेच्या सुमारास आरोपीनं भाजपच्या कार्यालयावर रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

Thane BJP Office News Today
Thane BJP Office News Today (HT_PRINT)

Thane BJP Office News Today : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आता ठाण्यातील भाजपा कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील महात्मा फुलेनगर भागातील भाजपाचे युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांच्या कार्यालयावर रॉकेल टाकून पेटवण्याची घटना घडली आहे. कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांनी वर्तकनगर भागातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून आरोपीला अटक करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.

ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष धनंजय बिस्वाल यांचं कार्यालय आहे. त्यांचं बहुमजली घर असून पहिल्या मजल्यात त्यांनी पक्षाचं कार्यालय तयार केलं आहे. धुलिवंदनाचा कार्यक्रम आटोपून बिस्वाल हे घरी आलेले असता पहाटे पाच वाजेच्या सुमारास कार्यालयाच्या खिडक्या फुटल्याचा आवाज त्यांना आला. त्यानंतर त्यांनी तातडीनं कार्यालयाच्या दिशेनं धाव घेतली. त्यावेळी एक व्यक्ती कार्यालयावर रॉकेल ओतून त्याला पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

बिस्वाल यांनी हाका मारताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. रस्त्याच्या कडेला त्यांच्या साथीदाराच्या दुचाकीवरून आरोपी पसार झाला. भाजपाचं कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर धनंजय बिस्वाल यांनी या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्यानं घेत अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. पोलिसांनी वर्तकनगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

WhatsApp channel