मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  घोटाळ्यांवरून जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये जुंपली; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही हसू आवरेना!

घोटाळ्यांवरून जयंत पाटील आणि फडणवीसांमध्ये जुंपली; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही हसू आवरेना!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 01:07 PM IST

Devendra Fadnavis In Vidhan Sabha : जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत एकमेकांवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

Devendra Fadnavis vs Jayant Patil In Assembly Budget Session
Devendra Fadnavis vs Jayant Patil In Assembly Budget Session (HT)

Devendra Fadnavis vs Jayant Patil In Assembly Budget Session : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचं कामकाज आजपासून पुन्हा सुरू झालं आहे. यंदाचा अर्थसंकल्प उद्या विधानसभेत सादर केला जाणार असून त्यासाठीची तयारी शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात आली आहे. आज विधानसभेत अतिवृष्टी, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. परंतु भाजपा आमदार आशिष शेलार आणि आमदार रईस शेख यांनी मांडलेल्या जमीन गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. जमीन गैरव्यवहार प्रकरणी तुम्हाला राग आलेला नाही, तुम्ही चिडलेले दिसत नाहीयेत, असं म्हणत जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं, त्यानंतर मला राग येतच नाही जयंतराव, असं म्हणत फडणवीसांनी त्यांना जोरदार टोला हाणला. त्यामुळं सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये एकच हशा पिकला.

सभागृहात नेमकं काय झालं?

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईसह राज्यातील हिंदू देवस्थानांच्या जमीनींच्या बाबतीत घोटाळे होत असल्याचा प्रश्न उपस्थित करत संबंधितांवर सरकार काय कारवाई करणार आहे?, असा प्रश्न केला. त्यानंतर सपाचे आमदार रईस शेख यांनी देखील हाच मुद्दा पुढे नेत वक्फ बोर्डाच्या जमीनींच्या गैरव्यवहाराचा मुद्दा मांडला. दोन्ही आमदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल, नियमानुसार आम्ही या प्रकरणात कारवाई करू, असं त्यांनी म्हटलं. परंतु देवेंद्र फडणवीस सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले असता जयंत पाटलांनी 'तुम्ही आज आक्रमक दिसत नाहीयेत, तुमच्यासमोर घोटाळा मांडला जाऊनही तुमच्या चेहऱ्यावर राग नाही आणि तुम्ही चिडलेले देखील नाहीयेत', असं म्हणत फडणवीसांना डिवचलं. त्यानंतर फडणवीसांनी क्षणाचाही विलंब न करता 'मला राग येतच नाही जयंतराव', असं म्हणत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

फडणवीसांनी उत्तर दिल्यानंतर जयंत पाटलांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्यांच्या प्रतिक्रियेची नोंद घेण्याची मागणी केली. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संधी साधत 'राग नाही, ते बदला म्हणून सगळ्यांनाच माफ करत सुटलेत', असं म्हणत फडणवीसांना जोरदार चिमटा काढला. त्यामुळं सभागृहात आमदारांना हसू आवरेनासं झालं. जयंत पाटील, अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांच्या हलक्याफुलक्या संवादानं सभागृहातील कामकाज खेळीमेळीनं पार पडताना दिसताच अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

IPL_Entry_Point