मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadnavis : वीजबिलावर ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही; फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार

Devendra Fadnavis : वीजबिलावर ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही; फडणवीसांचा शिवसेनेवर पलटवार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 28, 2022 11:55 AM IST

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : चिखलीतील सभेत वीजबिलाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शेलक्या शब्दांत टीका केली होती. त्याला आता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis (HT)

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : वीजबिलाच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत झालेल्या जाहीर सभेत ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल करत 'देवेंद्र फडणवीसांनी जनाची नाही, तर मनाची लाज बाळगावी', अशा शब्दांत टीका केली होती. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या त्या आव्हानाला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.

आम्ही शेतकऱ्यांकडून फक्त चालू वीजबिल वसू करत आहोत. थकीत विजबिल घेण्याची मागणी महावितरण करत नाहीये. त्यामुळं विजबिलाच्या मुद्द्यावरून बोलणाऱ्या उद्धव ठाकरेंनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. आम्ही वीजबिल माफ करू, असं कधीही म्हणालेलो नाही. कोरोना महामारीच्या काळात मध्यप्रदेशातील भाजप सरकारनं वीजबिल स्थगित केलं आणि नंतर माफ केलं. त्यामुळं महाराष्ट्रातही तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याची मागणी आम्ही केली होती. परंतु त्यावेळी महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना एक रुपयाचीही सूट दिली नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंना वीजबिलाच्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकारच नाहीये, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

दरम्यान बुलढाण्याच्या चिखलीतील जाहीर सभेत ठाकरेंनी फडणवीसांचा एक जुना व्हिडिओ शेयर करत त्यांच्या वीजबिलाच्या बदललेल्या भूमिकेवर बोट ठेवलं होतं. याशिवाय शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरूनही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली होती. परंतु आता वीजबिलाच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि फडणवीस आमने-सामने आल्यानं राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point