मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sundar elephant death: ‘सुंदर’ हत्तीचा कर्नाटकात मृत्यू; माहिती न दिल्यानं आमदार विनय कोरे भडकले

sundar elephant death: ‘सुंदर’ हत्तीचा कर्नाटकात मृत्यू; माहिती न दिल्यानं आमदार विनय कोरे भडकले

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 26, 2022 10:15 AM IST

Jyotiba Temple elephant death : कोल्हापूरातील जोतिबा मंदिरातील हत्तीचं कर्नाटकात निधन होऊनही त्याची माहिती न दिल्यामुळं नाराजी व्यक्त केली जात आहे.

Kolhapur Sundar Elephant
Kolhapur Sundar Elephant (HT)

Kolhapur Sundar Elephant : कोल्हापूरातील जोतिबा मंदिरातील सुंदर नावाच्या हत्तीचं कर्नाटकात निधन झालं आहे. महाराष्ट्रासह कोल्हापूरातील श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा मंदिरातील या हत्तीचा मृत्यू झाल्यानंतरही त्याची वार्ता न कळवल्यानं भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. याशिवाय या प्रकरणामुळं आमदार विनय कोरे हे देखील चांगलेच भडकले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी वारणा उद्योग समूहाकडून सुंदर या हत्तीला जोतिबा मंदिराला अर्पण करण्यात आलं होतं. परंतु मंदिर परिसरात हत्तीचा छळ होत असल्याचा आरोप करत पेटा या संस्थेनं हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर साखळदंडातून मुक्त करून त्याला प्राणीसंग्रहालयात सोडण्यात यावं, असा आदेश उच्च न्यायालयानं दिला होता. त्यानंतर सुंदर हत्तीला कर्नाटकातल्या बाणेरगठ्ठा पार्कमध्ये नेण्यात आलं होतं. परंतु सुंदर हत्तीचं २७ ऑगस्टला निधन होऊनही त्याची साधी माहितीही जोतिबा मंदिर प्रशासनाला किंवा भाविकांना देण्यात आलेली नाही.

कोल्हापूरात व्यक्त केला जातोय संताप...

कोल्हापूरातील जोतिबा मंदिरातील भक्त अनेकवेळा सुंदर हत्तीसाठी कर्नाटकातील पार्कमध्ये केळी आणि सफरचंद घेऊन जायचे. तसंच काही दिवासांपूर्वी काही भाविक पार्कमध्ये गेले असता त्यांना सुंदर या हत्तीचं निधन झाल्याचं समजलं. त्यानंतर कोल्हापूरातील जोतिबा भक्तांमध्ये मोठी नाराजी परसल्याचं पाहायला मिळत आहे. याशिवाय आमदार विनय कोरे यांनीही जोतिबांच्या पालखीचा मानकरी असलेल्या सुंदर हत्तीचं निधन झालं आणि याची माहिती न देण्यात आल्यामुळं संताप व्यक्त केला आहे. याशिवाय सुंदर हत्तीचं निधन झाल्याचं समजताच आमदार विनय कोरे यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

IPL_Entry_Point