मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  एसटीसाठी सरकारची ३०० कोटींची मदत; मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

एसटीसाठी सरकारची ३०० कोटींची मदत; मदत तुटपुंजी असल्याचा आरोप करत काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 09:24 AM IST

ST Mahamandal : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं ३०० कोटींची मदत जाहीर केली आहे. परंतु ही रक्कम तुटपुंजी असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे.

Govt Aid For ST Mahamandal
Govt Aid For ST Mahamandal (HT)

Govt Aid For ST Mahamandal : गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या एसटी महामंडळाला अखेर शिंदे-फडणवीस सरकारनं ३०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सरकारनं ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी जाहीर केलेली आहे. परंतु आता या मदतनिधीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शिंदे-फडणवीस सरकारविरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना महिन्याला पगार देण्यासाठी ३६० कोटी रुपयांची आवश्यकता असते. परंतु सरकारनं केवळ ३०० कोटी दिले असून ही रक्कम तुटपुंजी असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. त्यामुळं एसटी महामंडळानं सरकारला जितक्या रकमेची मागणी केली आहे, तेवढी रक्कम देण्यात यावी, अन्यथा एसटी कर्मचारी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये एसटीला मिळाले ६०० कोटी...

राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एसटी महामंडळाला गेल्या तीन महिन्यात ६०० कोटींचा निधी वितरित केलेला आहे. हा निधी कमी असल्यानं अनेक कर्मचाऱ्यांचे वेळेवर पगार झालेले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांकडून कोर्टात त्रिसदस्यीय समितीनं अहवाल दिलेला आहे. त्यात चार वर्षांच्या वेतनाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र तो कालावधी संपण्याआधीच सरकार निधी देण्यात कुचराई करत असल्याचा आरोप एसटी संघटनांनी केला आहे.

दरम्यान ठाकरे सरकारच्या काळात दिवाळीआधी पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने तात्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. त्यानंतर आता ऐन दिवाळीआधीच एसटी कर्मचारी आणि सरकारमध्ये पगारासाठी देण्यात आलेल्या निधीवरून संघर्ष होण्याची चिन्ह आहेत.

IPL_Entry_Point