मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : संजय राऊतांचं पत्र वाचताच गुलाबराव पाटलांनी देवाला केली प्रार्थना, म्हणाले...

Sanjay Raut : संजय राऊतांचं पत्र वाचताच गुलाबराव पाटलांनी देवाला केली प्रार्थना, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 13, 2022 07:45 AM IST

sanjay raut letter : कट्टर शिवसैनिक आणि खासदार संजय राऊत यांनी तुरुंगातून त्यांच्या आईला एक भावनिक पत्र लिहिलं आहे.

Gulabrao Patil On Sanjay Raut
Gulabrao Patil On Sanjay Raut (HT)

Gulabrao Patil On Sanjay Raut : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी कोठडी असलेले शिवसेना नेते संजय राऊतांनी कोठडीतून त्यांच्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत शिवसेनेतील बंडखोरी आणि अटकेच्या कारवाईचा उल्लेख केलेला आहे. त्यांनी आईला लिहिलेल्या भावनिक पत्रावर आता शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊत लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी आपण प्रार्थना करुयात, राजकारणात असो किंवा यात्रेत असो, एका मुलानं आईला पत्र लिहिणं ही एक भावनिक गोष्ट आहे. त्यांच्यावर काही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता ते तुरुंगात आहेत. देवाच्या कृपेनं ते लवकरात लवकर बाहेर येवोत, अशी आपण प्रार्थना करुयात, असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

नियमाप्रमाणेच राजीनामा मंजूर होईल- पाटील

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या नोकरीचा राजीनामा मुंबई महापालिकेनं अद्यापही मंजूर केलेला नाही. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीचा राजीनामा मंजूर करण्यासाठी काही नियमं असतात. काहीही झालं की राज्य सरकारकडे बोट दाखवणं चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करायला सरकारला वेळ नसल्याचंही गुलाबराव पाटील म्हणाले.

IPL_Entry_Point