मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: तुमच्यासाठी हा काळ किती कठीण आहे ते समजू शकतो; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

Sharad Pawar: तुमच्यासाठी हा काळ किती कठीण आहे ते समजू शकतो; शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 29, 2022 12:54 PM IST

sharad pawar writes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांच्या प्रकृतीबद्दल कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे.

Sharad Pawar - Narendra Modi
Sharad Pawar - Narendra Modi

sharad pawar writes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi ) यांची तब्येत बिघडल्यामुळं बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अहमदाबादेतील यूएन मेहता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याबद्दल कळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आईच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

आईची तब्येत बिघडल्याचं कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल अहमदाबादला दाखल झाले. रुग्णालयात जाऊन त्यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस केली. याचा उल्लेख शरद पवार यांनी आपल्या पत्रात केला आहे. 'काल आपण अहमदाबाद येथील रुग्णालयात गेला होता. आपल्या आईची प्रकृती स्थिर आहे आणि त्यात सुधारणा होत आहे हे समजल्यावर मलाही बरं वाटलं. आईशी तुमचं असलेलं घट्ट नातं मला माहीत आहे. त्यामुळं तुमच्यासाठी हा प्रसंग किती कठीण आहे याची मला जाणीव आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

‘आई हे पृथ्वीवरचं सर्वात पवित्र नातं आहे. तुमच्या जडणघडणीत तुमच्या आईचा मोलाचा वाटा आहे. आई ही तुमची अखंड ऊर्जास्त्रोत राहिली आहे. तिची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो व तिला निरोगी दीर्घायुष्य लाभो,’ अशी सदिच्छाही पवार यांनी पत्रात व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी स्वत: हे पत्र ट्विटरवर शेअर केलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग