मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad pawar : “..त्याबाबत माझेही मतभेद, पण काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही”; शरद पवारांचं वक्तव्य

Sharad pawar : “..त्याबाबत माझेही मतभेद, पण काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही”; शरद पवारांचं वक्तव्य

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 28, 2022 10:43 PM IST

Sharad pawar on congress : काँग्रेसच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुण्यात काँग्रेस भवन येथे आयोजित स्नेह मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असू शकतात, मात्र काँग्रेसमुक्त भारत होणे शक्य नाही.

शरद पवार
शरद पवार

पुणे – काँग्रेस मुक्तभारत करण्याचं काही लोक म्हणतात. मात्र काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही,असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात केलं आहे. काँग्रेसच्या १३७ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी तब्बल २४ वर्षांनी शरद पवार यांनी पुण्याच्या काँग्रेस भवनात हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी शरद पवारांना निमंत्रित केलं होतं. पवारांनी काँग्रेसचे निमंत्रण स्वीकारल्याने ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष होते.

काही लोक काँग्रेस मुक्त भारत करायचं म्हणतात, पण काँग्रेस मुक्त भारत होऊ शकत नाही. काँग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. काँग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण काँग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावं लागेल, असे पवार म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वर्धापनदिनानिमित्त शहर काँग्रेसतर्फे स्नेहमेळाव्याचे आयोजन काँग्रेस भवन येथे करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी उपस्थिती लावून काँग्रेसला शुभेच्छा दिल्या. शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी यावेळी पवार यांचे स्वागत केले. छत्रपती शाहू महाराज, खासदार श्रीनिवास पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, अनेक वर्षानंतर मी या वास्तूत आलो याचा आनंद आहे. १९५८ ला मी काँग्रेसचा सभासद झाल्यानंतर रोजची संध्याकाळ इथल्या कटट्यावर मोठया लोकांचे विचार ऐकण्यात जायची. काँग्रेसची स्थापना होण्याआधी भारतीय राष्ट्रीय सभा नावाची संघटना होती,या सभेचे रुपांतर काँग्रेसमध्ये व्हावी अशी बैठक पुण्यात झाली होती. त्यानंतर काँग्रेसच्या स्थापनेची बैठक होणार होती, पण प्लेग मुळे ही बैठक पुण्याऐवजी मुंबईला झाली.

काहीजण आम्हाला काँग्रेस मुक्त भारत करायचा आहे म्हणत आहेत,भारत पुढे जायचा असेल तर काँग्रेसला सोबत घ्यावे लागले. काँग्रेसचा विचार दुर्लक्षीत करता येणार नाही. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना काँग्रेसबद्दल द्वेष कसा वाढेल यातच धन्यता मानत आहे. काँग्रेस मुक्त भारत या आघोरी विचाराविरोधात आम्ही समविचारी पक्ष सोबत आहोत, अशा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

सन १९९९ नंतर प्रथमच काँग्रेस भवनात

शरद पवार यांनी १९९९ ला काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापन केली. १९५८ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय असलेले पवार यांच्या काँग्रेस भवनातील अनेक आठवणी आहेत. पण काँग्रेस सोडल्यानंतर ते कधीही या वास्तूमध्ये आले नव्हते. आज वर्धापनदिनाचा मुहूर्त साधत पवार यांनी काँग्रेस भवनाला भेट दिली. पवार येणार म्हणून महाविकास आघाडातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही मोठी गर्दी केली होती. तसेच यावेळी भाजप,रिपाइ,आप यासह इतर सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी हजेरी लावली होती.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या