मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kharge : 'डबल इंजिन सरकार आणा, नाहीतर आणखी चार डबे जोडा, लोकांसाठी काय केलं ते सांगा?'

Kharge : 'डबल इंजिन सरकार आणा, नाहीतर आणखी चार डबे जोडा, लोकांसाठी काय केलं ते सांगा?'

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 29, 2022 12:07 PM IST

Mallikarjun Kharge on BJP : डबल इंजिन सरकारचा फॉर्मुला मांडणाऱ्या मोदी-शहा जोडीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

Mallikarjun Kharge - Modi - Shah
Mallikarjun Kharge - Modi - Shah

Mallikarjun Kharge on BJP : काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात असलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यातील भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारवर जोरदार हल्ला चढवला. 'महाराष्ट्रातील भाजपचं सरकार हे चोरांचं सरकार आहे,' अशी टीका खर्गे यांनी केली.

'महाविकास आघाडीचे आमदार खरेदी करून भाजपनं महाराष्ट्रात सरकार बनवलं. भाजपचं सरकार यावं यासाठी केंद्र सरकारनं जोर लावून अनेक आमदारांच्या मागे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या चौकशांचा ससेमिरा लावला, खोट्या तक्रारीत फसवण्यात आलं. ब्लॅकमेल करून भाजपनं महाराष्ट्रातील सत्ता बळकावली. ज्यांच्यावर भाजपनं भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, तेच लोक आज त्यांच्यासोबत आहेत. भ्रष्ट लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून स्वच्छ करण्यात आलंय. हे चोरांचं सरकार आहे. लोकांना घाबरवून त्यांनी सत्ता मिळवली आहे. पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी घाबरण्याची गरज नाही, असं खर्गे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्याराज्यात सांगितल्या जाणाऱ्या डबल इंजिन फॉर्मुल्याची खर्गे यांनी खिल्ली उडवली. 'केंद्रातही खोटे बोलणाऱ्यांचं सरकार आहे. उद्या इथं येऊन मोदी-शहा म्हणतील की डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार असू दे, नाहीतर आणखी चार बोगी लावा, पण जनहिताचं काम काय केले ते सांगा? असं त्यांना विचारा,' असं आवाहन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना केलं.

‘खोटं बोल पण रेटून बोल’, ही भाजपाची नीती आहे, सगळी जुमलेबाजी आहे. देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देतो असे पंतप्रधान मोदी सांगतात, पण तुम्ही कुठुन देता? हे तर काँग्रेसनं केलेलं काम आहे. अन्न सुरक्षा कायदा काँग्रेसनं केला, रेशन दुकानांची व्यवस्था काँग्रेस सरकारनंच उभी केली. देशात अन्नांचा तुटवडा असायचा, पण काँग्रेस सरकारनं हरित क्रांती आणली, धवलक्रांती आणली म्हणून देशात धान्यांची गोदामं भरलेली आहेत. आज मोफत धान्य मिळतंय, पण एक दिवस मोदी हे मोफत धान्य सुद्धा बंद करतील, असा सावधानतेचा इशारा खर्गे यांनी दिला.

दलित, वंचितांना खर्गेंचं आवाहन

दलित, महिला, वंचित, मागास, अल्पसंख्याक लोकांना माझं सांगणं आहे की आपण सर्वांनी मिळून लोकशाही, संविधान वाचवायचे आहे, हे आपले कर्तव्य आहे. आरएसएस, भाजप लोकशाहीला संपवून हुकूमशाही आणू पाहत आहेत. भाजपनं कितीही घाबरवण्याचे काम करू द्या तुम्ही घाबरू नका, खंबीरपणे काम करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिलेले हक्क व अधिकार अबाधित ठेवायचे असतील तर भाजपाला सत्तेतून खाली खेचा, असं आवाहनही त्यांनी केलं.

IPL_Entry_Point