मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Panchayat Election : राज्यात सर्वाधिक सरपंच आमचेच; महाविकास आघाडीचा दावा

Gram Panchayat Election : राज्यात सर्वाधिक सरपंच आमचेच; महाविकास आघाडीचा दावा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 21, 2022 03:32 PM IST

Gram Panchayat Election : विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत मविआचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.

Ajit Pawar On Gram Panchayat Election Result
Ajit Pawar On Gram Panchayat Election Result (HT)

Ajit Pawar On Gram Panchayat Election Result : राज्यातील सात हजारांहून अधिक ग्रामपंचातीतील निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. यात भाजप आणि शिंदे गटानं बाजी मारली असून त्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं जागा मिळवल्या आहेत. निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत भाजप-शिंदे गटाच्या युतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्याचा दावा केला होता. याशिवाय फडणवीसांनी राज्यात भाजपचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात मविआचे सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे.

नागपुरात माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती आला असून त्यात ३२५८ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत. त्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेसच्या सरपंचांचा समावेश आहे. भाजप आण शिंदे गटाला ३०१३ आणि इतर पक्षांचे उमेदवार १३६१ ग्रामपंचायतींवर निवडून आले आहेत. इतर पक्षांतील ७६१ नवनिर्वाचित सरपंच हे मविआशी संबंधित लोक आहेत. अशा पद्धतीनं ४०१९ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीचे सरपंच निवडून आल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला आहे.

निकालाआधीच सत्ताधाऱ्यांनी खोटी आकडेवारी दिली- पवार

ग्रामपंचायतींचे संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवल्याचा दावा केला. परंतु तो दावा धादांत खोटा होता. रात्री उशिरापर्यंत निकाल लागत होते, आज सकाळीही वर्तमानपत्रात योग्य माहिती समोर आलेली आहे. असं म्हणत अजित पवारांनी सहकारी नेत्यांना पेढा भरवला आहे.

IPL_Entry_Point