मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू; वसईतील धक्कादायक घटना

Electric Scooter : इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट झाल्यानं चिमुकल्याचा मृत्यू; वसईतील धक्कादायक घटना

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 02, 2022 07:33 AM IST

Electric Scooter Explosion In Vasai : इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावलेली असताना ही घटना घडली आहे. त्यामुळं आता वसईत खळबळ उडाली असून इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Electric Scooter Explosion In Vasai
Electric Scooter Explosion In Vasai (HT)

Electric Scooter Explosion In Vasai : इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंगला लावलेली असताना त्याचा स्फोट झाल्यानं त्यामुळं सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना वसईतून समोर आली आहे. या घटनेनं मुंबईत खळबळ उडाली असून इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शब्बीर शाहनवाज अन्सारी असं मृत चिमुकल्याचं नाव असून पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वसईतील रामदासनगरमध्ये शाहनवाझ अन्सारींनी त्यांची इलेक्ट्रिक स्कूटरला हॉलमध्ये चार्जिंगला लावलेलं होतं. परंतु भल्या पहाटे स्कूटरचा मोठा भीषण स्फोट झाला. त्यावेळी शाहनवाझ हे त्यांच्या पत्नी आणि मुलासह हॉलमध्ये झोपलेले होते. त्यावेळी स्फोटात मुलगा शब्बीर ८० टक्के भाजल्यानं त्याचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नीही जखमी झाली आहे. याशिवाय या स्फोटामुळं शाहनवाझ यांच्या घराचं मोठं नुकसान झालं आहे. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

माणिकपूर पोलिसांनी इलेक्ट्रिक स्कूटरच्या ओव्हरचार्ज किंवा शॉर्ट सर्किटमुळं हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे पीआय संपत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागण्याच्या असंख्य घटना समोर आलेल्या आहेत. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्फोट झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक स्कूटर तयार करणाऱ्या पाच कंपन्यांना नोटिस बजावली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आल्यानं इलेक्ट्रिक स्कूटरच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

IPL_Entry_Point

विभाग