मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abu Azmi : फक्त शहरांचंच नाही तर महाराष्ट्राचंही नामांतर करा; आमदार अबु आझमींची मागणी

Abu Azmi : फक्त शहरांचंच नाही तर महाराष्ट्राचंही नामांतर करा; आमदार अबु आझमींची मागणी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 22, 2023 05:38 PM IST

Abu Azmi News Today : रायगड या नावालाही काहीही अर्थ नाही, त्याचंही नामांतर करायला हवं, अशी मागणी करत आझमींनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

Abu Azmi On Name Change Politics
Abu Azmi On Name Change Politics (HT)

Abu Azmi On Name Change Politics : राज्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचं नामांतर झाल्यानंतर आता अहमदनगरच्या नामांतराच्या मागणीनंही जोर धरला आहे. नगरच्या नामांतरावरून भाजपा आणि शिंदे गटातील वादही चव्हाट्यावर आलेला असतानाच आता समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी थेट महाराष्ट्राचं नामांतर करण्याची मागणी केली आहे. फक्त जिल्ह्यांचंच नाही तर महाराष्ट्राचंही नाव बदलण्यात यावं, अशी मागणी आमदार अबु आझमी यांनी केल्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील एखाद्या विशिष्ट जिल्ह्याचं नाव बदलण्यापेक्षा महाराष्ट्राचंच नाव बदलायला हवं. छोट्या जिल्ह्यांचं नाव बदलण्यात काहीही अर्थ नाही. महाराष्ट्राला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायला हवं, त्यानंतर आम्हीही सरकारच्या निर्णयाचं स्वागत करू, असं वक्तव्य आमदार अबु आझमी यांनी केलं आहे. शहरांची मुस्लिम नावं बदलणं हे समाजात धृवीकरण करण्याचा प्रयत्न आहे. ठाणे, नवी मुंबई आणि रायगडचंही नामांतर करायला हवं, अशी मागणी आझमींनी केली आहे.

मुस्लिम समाजात छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा आदर केला जातो. त्यांनी मुस्लिमांसाठीही खूप काही केलेलं असून त्यावेळची लढाई ही धर्मासाठी नव्हे तर सत्तेसाठी होती. परंतु आता इतिहासात कुणाचा पराभव झाला, त्यावरून राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं आमदार अबू आझमी म्हणाले. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या शहरांची नावं मुस्लिम लोकांची आहेत. पूर्वीपासूनच या शहरांचं नाव असल्यामुळं ते बदलण्यात येऊ नये, अशी सपाची भूमिका आहे. नामांतरामुळं राज्यात कोणताही विकास होणार नाहीये. याउलट नुकसानच होणार असल्याचंही आझमी म्हणालेत.

IPL_Entry_Point