मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Renaming : पुण्याचे नामांतर 'जिजाऊ नगर' असं करण्याची मागणी; हिंदू महासंघाचा विरोध

Pune Renaming : पुण्याचे नामांतर 'जिजाऊ नगर' असं करण्याची मागणी; हिंदू महासंघाचा विरोध

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 13, 2023 04:11 PM IST

Pune Renaming : पुण्याचं नामांतर 'जिजाऊ नगर' असं करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Pune City
Pune City

Amol Mitkari on Pune Renaming : नामांतराच्या रांगेत असलेल्या शहरांमध्ये आता आणखी एका शहराची भर पडली आहे. पुणे शहराचे नामकरण 'जिजाऊ नगर' करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. हिंदू महासंघानं मात्र या मागणीस विरोध केला आहे. त्यामुळं येत्या काळात हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. 'पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार आहे, असं मिटकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलं आहे.

मिटकरी यांच्या या मागणीला हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी विरोध केला आहे. 'पुण्याचं नामांतर करण्यची गरज नाही. जिजाऊंचं भव्य आणि वेगळं स्मारक उभारता येईल. ते लाल महाल इथं उभारावं, असं आनंद दवे यांनी म्हटलं आहे.

‘राजमाता जिजाऊ या सर्वांनाच वंदनीय आहेत. पुण्याचं आणि त्यांचं नातं सुद्धा आहे. पण पुणे हे नाव पुण्यश्वर महादेवामुळं पडलं आहे. ते बदलण्याची गरज नाही. स्वतः शिवभक्त शिवछत्रपती यांनी सुद्धा ते बदललं नाही, याकडं दवे यांनी लक्ष वेधलं. 'खरंतर पुण्यश्वर महादेवाला दर्ग्यातून बाहेर काढण्यासाठी ब्रिगेडनं आमची साथ द्यायला हवी. राजमाता जिजाऊ यांना ते जास्त आवडेल, असं आवाहनही दवे यांनी केलं आहे.

यापूर्वी संभाजी ब्रिगेडनं पुण्याचं नामांतर 'जिजाऊ नगर' असं करण्याची मागणी केली होती, मात्र त्यास फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. आता खुद्द मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षानंच तशी मागणी केल्यामुळं त्यास महत्त्व प्राप्त झालं आहे.

IPL_Entry_Point

विभाग