'रामायण' या महाकाव्यावर आधारित नाटक सादर करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पुणे विद्यापीठातील प्राध्यापक आणि पाच विद्यार्थ्यांना शनिवारी अटक करण्यात आली. या नाटकात आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये असल्याचे बोलले जात आहे. या नाटकात सीतेचा वेश परिधान केलेला एक पुरुष अभिनेता धुम्रपान करताना दिसत आहे. या नाटकावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि पुणे विद्यापीठाचा भाग असलेल्या पुणे ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये शुक्रवारी सायंकाळी हाणामारी झाली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे हर्षवर्धन हरपुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (अ) व इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिली.
एफआयआरनुसार, या नाटकात सीतेची भूमिका साकारणारा एक पुरुष अभिनेता धूम्रपान आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करताना दाखवण्यात आला आहे. एफआयआरनुसार, जेव्हा अभाविपच्या सदस्यांनी नाटकावर आक्षेप घेतला आणि नाटक थांबविण्यासाठी हस्तक्षेप केला, तेव्हा कलाकारांनी त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण केली.या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, विद्यार्थी भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी आणि यश चिखले यांना पोलिसांनी अटक केली आहे.