मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Railway Station : पुणेकरांसाठी मोठी बातमी, रेल्वे स्टेशन दररोज चार तासांसाठी राहणार बंद, कारण काय?

Pune Railway Station : पुणेकरांसाठी मोठी बातमी, रेल्वे स्टेशन दररोज चार तासांसाठी राहणार बंद, कारण काय?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 17, 2023 09:51 AM IST

Pune Railway Station News : पुण्यातील रेल्वे स्टेशन दररोज चार तास बंद राहणार असल्यामुळं अनेक रेल्वेगाड्या रद्द होण्याची शक्यता आहे.

Pune Railway Station News Updates
Pune Railway Station News Updates (HT)

Pune Railway Station News Updates : पुण्याहून मुंबई आणि अन्य शहरात प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण आता पुणे रेल्वे स्टेशन दररोज चार तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेने स्थानकातील फलाट विस्तारीकरणाचं काम हाती घेतलं आहे. त्यासाठी दररोज चार तास स्थानक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळं अनेक रेल्वेगाड्याचं वेळापत्रक कोलमडणार असून प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. ज्यावेळी पुणे रेल्वे स्थानक बंद असेल त्यावेळी स्थानकातून एकही रेल्वे ये-जा करणार नसल्याने त्याचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवर होणार आहे. रिमॉडेलिंगच्या कामासाठी अनेक रेल्वे रद्द केल्या जाणार असल्याची माहिती आहे.

पुणे रेल्वे स्थानकातील रिमॉडेलिंगचं काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु आता रेल्वे प्रशासनाने रिमॉडेलिंगचं काम तीन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचं ठरवलं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या उच्चस्पद अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीत पावसाळा किंवा अन्य गोष्टींची वाट न पाहता रिमॉडेलिंगचं काम पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलं आहे. त्यानुसार आता फलाट विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. त्यामुळं आता पुणे रेल्वे स्टेशनवरून धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील रेल्वे स्थानकातून २४ तासांत तब्बल १५५ रेल्वेगाड्या धावतात. त्यापैकी ६५ रेल्वे या पुण्यातून सुटतात. याशिवाय पुण्यातून एका दिवसात दीड लाखांच्या आसपास प्रवासी रेल्वेतून प्रवास करणं पसंत करतात. त्यामुळं आता फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आल्यानंतर हडपसर आणि शिवाजीनगर स्थानकातून काही गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यामुळं आता पुढील तीन महिने पुण्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

IPL_Entry_Point