मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur Crime News : मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या आरोपीला अटक, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

Nagpur Crime News : मंत्रिपदाचं आमिष दाखवून आमदारांना लुटणाऱ्या आरोपीला अटक, नागपूर पोलिसांची मोठी कारवाई

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 17, 2023 08:50 AM IST

Maharashtra Crime News : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांचा विश्वासू असल्याचं सांगत आरोपीने अनेक आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

Maharashtra Nagpur Crime News
Maharashtra Nagpur Crime News (HT_PRINT)

Maharashtra Nagpur Crime News : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुंबईत हालचाली सुरू असतानाच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा विश्वासू असल्याचं सांगत गुजरातमधील एका आरोपीने महाराष्ट्रातील भाजपाच्या आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवत पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी गुजरातच्या मोरबी शहरातून आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. नीरज सिंह राठोड असं आरोपीचं नाव असून त्याने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भाजपाच्या आमदारांना फोन केल्याचं तपासातून समोर आलं आहे. राज्यातील काही आमदारांनी आरोपीच्या जाळ्यात अडकून त्याला कोट्यवधींची रक्कम दिल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळं आता नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास कुंभारे यांना सात मे रोजी नीरज सिंह राठोडने फोन करून मंत्रिपद मिळवून देण्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांची मागणी केली. यावेळी आमदार कुंभारे यांनी संबंधित आरोपी हा जेपी नड्डा यांच्या जवळचा आहे की नाही, याची तपासणी सुरू केली. तसेच नागपूर पोलिसांत त्याच्याविरोधात लेखी तक्रारही दाखल केली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी नीरज सिंह विरोधात गुन्हा दाखल करत त्याला गुजरातच्या मोरबी शहरातून अटक केली आहे. नीरज सिंहने महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा तसेच कोकणातील अनेक आमदारांना मंत्रिपदाचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं बोललं जात आहे.

पोलिसांनी नीरज सिंहला अटक केली असून त्याला लवकरच नागपुरात आणलं जाणार आहे. आरोपी नीरज सिंहने आतापर्यंत किती आमदारांना फोन केले, त्यांच्याकडून किती रक्कम वसूल केली, याचा तपास पोलिसांकडून केला जाणार आहे. नीरज सिंहने यापूर्वी गोवा आणि नागालँडमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाचं गाजर दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहितीही समोर आली आहे.

IPL_Entry_Point