मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Gurav : जगातील चार सर्वोच्च शिखरं केवळ एका वर्षात केली सर; पुण्यातील पीएसआयची मोठी कामगिरी

Sambhaji Gurav : जगातील चार सर्वोच्च शिखरं केवळ एका वर्षात केली सर; पुण्यातील पीएसआयची मोठी कामगिरी

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 11:52 AM IST

Sambhaji Gurav Pune Police : पुण्यातील पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी जगातील चार सर्वोच्च शिखरांची केवळ एका वर्षात चढाई केली आहे.

Sambhaji Gurav Pune Police
Sambhaji Gurav Pune Police (HT)

Sambhaji Gurav Pune Police : पुणे पोलीस दलातील शीघ्र कृती दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर असलेलं माउंट कोजीअस्को शिखर सर केलं आहे. हे शिखर सर करणारे ते महाराष्ट्र पोलिस दलातील पहिले अधिकारी आहे. मिशन सेवन समिट मोहिमेतील हे त्यांचे चौथे शिखर असल्यानं त्यांचं पोलीस दलात कौतुक केलं जात आहे.

गुरव यांनी २३ मे २०२१ रोजी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर चढाई करत विक्रम रचला होता. त्यानंतर त्यांनी जगातील सातही खंडातील शिखरं सर करण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यात त्यांना यश आलं आहे. त्यांनी २६ जुलै २०२१ रोजी युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुस सर केलं. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२१ रोजी अफ्रिका खंडांतील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो शिखर सर केलं. सलग तीन शिखरं सर करण्याची सुवर्णसंधी असताना अचानक कोरोना महामारी आली. त्यामुळं त्यांना व्हिसा मिळण्यात अडचणी आल्या. परिणामी त्यांच्या मोहिमेत मोठा खंड पडला होता. त्यानंतर त्यांनी कोरोना महामारी संपल्यानंतर ही पुन्हा शिखरांवर चढण्याची मोहिम हाती घेत मोठी कामगिरी केली आहे.

गुरव यांनी ऑस्ट्रेलिया खंडातील न्यू साऊथ वेल्समधील माउंट कोजीअस्को शिखर करण्याचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. डिसेंबर ते मार्च महिन्यात तिथं कडाक्याची थंडी असते, अनेकदा तापमान शून्यापेक्षाही खाली येतं. अशा वेळी या वातावरणात दृष्मानता ही कमी होत असल्यानं हे शिखर चढणं सोपं नव्हतं, त्यासाठी मी पूर्वतयारी केलेली होती, त्यामुळंच हे शक्य झाल्याचं पोलीस निरिक्षक संभाजी गुरव यांनी सांगितलं. त्यांनी एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर पोलीस महासंचालक संजय कुमार, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, पोलीस उपायुक्त आर राजा आणि पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांचे आभार मानले आहेत.

IPL_Entry_Point