मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS vs BJP : भाजप आणि शिंदे गटाच्या विस्तारवादामुळं मनसे सावध; एकमेव आमदारानं दिला ‘हा’ इशारा

MNS vs BJP : भाजप आणि शिंदे गटाच्या विस्तारवादामुळं मनसे सावध; एकमेव आमदारानं दिला ‘हा’ इशारा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Oct 01, 2022 11:15 AM IST

MNS vs Shinde-Fadnavis Govt : आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेच्या मदतीशिवाय कल्याणचा पुढील खासदार निवडून येऊ शकणार नसल्याचं वक्तव्य मनसेच्या एकमेव आमदारानं केलं आहे. त्यामुळं आता युतीच्या चर्चा सुरू असतानाच मनसेनं भाजपला थेट इशारा दिला आहे.

MNS vs BJP On Kalyan Loksabha Election 2024
MNS vs BJP On Kalyan Loksabha Election 2024 (HT)

MNS vs BJP On Kalyan Loksabha Election 2024 : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युती होणार अस ल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत अनेकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात चर्चा देखील झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता राज्यातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटलांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून आणि राज्यातील पालकमंत्र्यांच्या निवडीवरून भाजप आणि शिंदे गटाला इशारा दिला आहे.

कल्याणमधील अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाला आमदार राजू पाटलांनी भेट दिली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही, हे आधीच स्पष्ट केलंय. परंतु मनसेच्या पाठिंब्याशिवाय कल्याणचा पुढील खासदार निवडून येणार नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला मोठा इशारा दिला आहे.

मला आमदारकी लढायची नव्हती. परंतु ऐनवेळी राज ठाकरेंनी निवडणुकीला लढण्यास सांगितलं त्यावेळी मी होणार दिला आणि निवडूनदेखील आलो, त्यांनी खासदारकी लढवायला सांगितली तर मी लोकसभा निवडणुकही लढेन. परंतु मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही, हे आम्ही आधीच स्पष्ट केलंय, परंतु कल्याणमध्ये जो खासदार होईल तो आमच्या पाठिंब्यानंच होईल, असं वक्तव्य आमदार राजू पाटलांनी केलं आहे.

घराणेशाहीवरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला...

काही दिवसांपूर्वी शिंदे गटानं युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली होती. त्यात बहुतांश नावं ही आमदार किंवा खासदारांच्या मुलांची होती. त्यामुळं विरोधकांनी शिंदे गटावर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यावर बोलताना राजू पाटील म्हणाले की, सात-आठ वर्ष झाली आपण बघतोय, शिंदे गटात घराणेशाही नवीन नाहीये, असं म्हणत त्यांनी खासदार श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला आहे.

पालकमंत्र्यांच्या निवडीवरून मनसेची नाराजी…

शिंदे-फडणवीस सरकारनं काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्याची घोषणा केली होती. त्यावरून राजू पाटलांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोणत्याही जिल्ह्याचा पालकमंत्री हा स्थानिक असायला हवा. मंत्री शंभूराजे देसाई यांना ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय. पण यात कुठेतरी गडबड दिसतेय. कारण सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्यानंच असं होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

कल्याणमधून सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सुपूत्र श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत. परंतु भाजपनं हा मतदारसंघ जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दोनवेळा कल्याणचा दौरा केला होता. त्यामुळं श्रीकांत शिंदे हे ठाण्यातून लढणार असून कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

IPL_Entry_Point