मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Parvati Crime News : आमदार माधुरी मिसाळ यांना ठार मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Parvati Crime News : आमदार माधुरी मिसाळ यांना ठार मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 25, 2022 02:16 PM IST

Parvati Crime News : पर्वतीच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे.

Extortion Case In Parvati Pune
Extortion Case In Parvati Pune (HT)

Extortion Case In Parvati Pune : भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना मेसेज करून पाच लाखांची खंडणी मागितल्याचं प्रकरण समोर आल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. आमदार मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर मेसेज करून आरोपीनं खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडिबा मिसाळ यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडीगाव,पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ ते २३ सप्टेंबर दरम्यान घडला आहे, अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच त्यांची भावजय आणि आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर आरोपीनं मेसेज केले होते. त्यात त्यानं कधी दोन लाख कधी तीन लाख तर कधी पाच लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले. सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर या व्यातिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर आरोपीनं पैसे न दिल्यास आमदार मिसाळ यांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून आता पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की, बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार माधुरी मिसाळ यांचे दिर दीपक मिसाळ यांना खंडणीची मागणी करून आमदार माधुरी मिसाळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर आता आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

IPL_Entry_Point