मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हद्दच झाली… महाराष्ट्रातले नागरिक दरवर्षी पितात २ लाख कोटी रुपयांची दारू

हद्दच झाली… महाराष्ट्रातले नागरिक दरवर्षी पितात २ लाख कोटी रुपयांची दारू

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 07, 2023 07:15 PM IST

महाराष्ट्र आहे की मद्यराष्ट्र आहे असा प्रश्न पडतो. महाराष्ट्रातली लोकं दरवर्षी तब्बल दोन लक्ष कोटी रुपयांची दारू पितात, अशी धक्कादायक माहिती डॉ. बंग यांनी या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एका मुलाखतीत दिली. (Liquor Ban in Maharashtra)

डॉ. अभय बंग, व्यसनमुक्ती कार्यकर्ते
डॉ. अभय बंग, व्यसनमुक्ती कार्यकर्ते

वर्धा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ समाजसेवक, गडचिरोली जिल्ह्यात व्यसनमुक्ती चळवळ राबवणारे पद्मश्री डॉ. अभय बंग यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मूळचे वर्ध्याचे रहिवासी असलेले डॉ. बंग यांची साहित्य संमेलनात ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ, ‘मुक्तांगण’ व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉ. मुक्ता पुणतांबेकर व महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य सल्लागार विवेक सावंत यांनी मुलाखत घेतली. डॉ. बंग यांनी यावेळी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. या मुलाखतीदरम्यान डॉ. बंग यांनी सरकारी दारूबंदीचा फोलपणा उघड करताना महाराष्ट्रात दारूबंदीऐवजी दारूमुक्तीची कशी आवश्यकता आहे, हे विषद केलं.

ट्रेंडिंग न्यूज

डॉ. बंग म्हणाले, ‘महाराष्ट्रात वर्धा आणि गडचिरोली या दोनच जिल्ह्यांमध्ये दारुबंदी आहे. गडचिरोलीपेक्षा वर्ध्याच्या दारुबंदीवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतात. समाजात दारू हा प्रश्न आहे की दाररूबंदी हा प्रश्न आहे, हे आधी ठरवलं गेलं पाहिजे. ज्यांना दारूच्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष जाऊ नये असं वाटतं ते दारूबंदीचा बागुलबुवा उभा करतात आणि मूळ प्रश्नापासून समाजाचं लक्ष हटवतात’, असं निरीक्षण मांडलं.

महाराष्ट्रातली लोकं दरवर्षी तब्बल दोन लाख कोटी रुपयांची दारू पितात

महाराष्ट्रातली लोकं दरवर्षी तब्बल दोन लक्ष कोटी रुपयांची दारू पितात, अशी धक्कादायक माहिती डॉ. बंग यांनी या मुलाखतीदरम्यान दिली. हा महाराष्ट्र आहे की मद्यराष्ट्र आहे असा मला प्रश्न पडतो. शासकीय आकडेवारी आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तपशीलावरून हा निष्कर्ष निघत असल्याचं डॉ. बंग म्हणाले. इथली लोकशाही दारूने भ्रष्ट झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण दारूच्या पैशांवर चालतं. महाराष्ट्राच्या निवडणुका या दारूच्या पैशांवर आणि नशेवर जिंकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. स्त्रियांवर जेवढ्या काही विनयभंग आणि बलात्काराच्या घटना घडतात त्यामागे दारू असते. एअऱ इंडियाच्या विमानात दारूच्या नशेत एका प्रवाशाने एका महिला प्रवाशाच्या अंगावर लघुशंका केली. ते घाणेरडं कृत्य होतं. तो व्यक्ती दारूच्या नशेत होता. तुम्ही दारुला कधी शिक्षा करणार, असा प्रश्न डॉ. बंग यांनी यावेळी उपस्थित केला. त्यामुळे प्रश्न दारू आहे की दारूबंदी आहे हे आधी ठरवलं पाहिजे.

जगात सर्वाधिक मृत्यूस दारू कारणीभूत

२०१७ मध्ये ‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज स्टडी’ नावाचा जगातला सर्वात मोठा आरोग्याचा अभ्यास झाला असून त्यात ४ अब्ज लोकांच्या आरोग्याचा डाटा वापरला गेला आहे. या अभ्यासात दोन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. जगामध्ये मृत्यू आणि विकलांगतेची जेवढी काही कारणं आहे या सर्व कारणांमध्ये शीर्ष स्थानावर दारू आणि दुसऱ्या क्रमांकावर तंबाखूचं सेवन हे कारण नमूद करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. बंग यांनी दिली. याहून मोठा आरोग्याचा अभ्यास जगाच्या इतिहासात झालेला नसून या अभ्यासावर ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध पत्रिकेने विशेषांक प्रकाशित केला होता. त्यामुळे दारू आणि तंबाखू हे सुख आणि गंमत देणारे पदार्थ राहिलेले नसून ते आधुनिक प्लेग आणि कॉलरा असल्याचं डॉ. बंग म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप शाखेने एक निवेदन जारी करून समाजात दारूवर नियंत्रण असलं पाहिजे. दारू पिण्याचं प्रमाण शून्य असलं पाहिजे असं म्हटलं आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या