Pankaja Munde : ‘मी जिथे जाईल तिथे माझ्यामागे याल का?’, पंकजा मुंडेचं कार्यकर्त्यांसमोर सूचक वक्तव्य
Pankaja Munde Speech : मुंडे साहेब पाठीमागं हात बांधून निघाले तर अनेक लोक त्यांच्यामागे निघायची. मला त्यांच्यासारखं जमेल का?, असा सवालही भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी केला आहे.
Pankaja Munde In Pimpari Chinchwad : गेल्या अनेक महिन्यांपासून पंकजा मुंडे या भाजपमधील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहे. याशिवाय पंकजा मुंडे या भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. परंतु आता पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांशी पक्षांतराबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं त्यांच्या पक्षांतराबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. पुण्यातील चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यासाठी पंकजा मुंडे या चिंचवडमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी थेट कार्यकर्त्यांसमोरच 'मी जिथे जाईल तिथे माझ्यामागे याल का?', असा सवाल करत पक्षांतराच्या चर्चांना हवा दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाजपच्या उमेदवार आश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ पंकजा मुंडे यांनी चिंचवडमधील अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे साहेब जेव्हा पाठीमागे हात बांधून निघाले की लोक त्यांचे मागे निघायचे. मी हात बांधून निघाले तर मलाही त्यांच्यासारखं जमेल का?, मी जिकडे जाईल तिथं तुम्ही माझ्या पाठिमागे याल का?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केला आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे या लवकरच भाजपला रामराम करणार असल्याच्या चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरील नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता त्यांनी थेट भाजपच्या कार्यकर्त्यांसमोरच नाराजी व्यक्त केल्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
राजकारण करणं काही सोपं काम नाही, अनेक वर्षे खपल्यानंतरही पद मिळत नाही. आपल्या नेत्यांकडे बघून कार्यकर्ता काम करत असतो. एखादा परिवार लोकांची सेवा करण्याचं काम करत असेल तर त्यांच्या पाठिशी लोकांनी उभं रहायला हवं, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सध्या तरी कार्यकर्त्यांना मतदान करण्यासाठी जायचं आहे. येत्या २६ फेब्रुवारीला भाजपला मतदान करण्याचं आवाहनही पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांसह मतदारांना केलं आहे.