मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Atal Setu : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू बेस्ट, एसटी आणि NMMT साठी खुला करा’

Atal Setu : मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू बेस्ट, एसटी आणि NMMT साठी खुला करा’

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 10, 2024 11:50 PM IST

Mumbai Trans-Harbour Link : शिवडी-न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतूचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. हा सेतू सार्वजनिक वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याबरोबरच टोलमाफी देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Mumbai Trans Harbor Sea Bridge (file Pic)
Mumbai Trans Harbor Sea Bridge (file Pic)

Mumbai Trans-Harbour Link project:शिवडी-न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतू हाकाँग्रेसच्या संकल्पनेतून साकारलेला प्रकल्प आहे. मुंबई महानगर प्रदेशातील अधिकाधिक सामान्य लोकांना त्याचा उपयोग व्हावा,यासाठी या मार्गावर सार्वजनिक बसगाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका खुली करा,अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली. बेस्ट,एसटी आणि एनएमएमटीच्या गाड्यांना टोलमाफी देत इतर वाहनांसाठीही टोल कमी करावा,अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे.

MTHLची संकल्पना सर्वप्रथम काँग्रेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २००४ साली मांडली होती. काँग्रेसचेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी देत या प्रकल्पाचं भूमीपूजन केलं होत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही काँग्रेसच्या प्रयत्नांनी या प्रकल्पाला भरघोस निधी मिळाला आणि प्रकल्पाला वेग आला.

या सागरी सेतू प्रकल्पाचा मोठा फायदा मुंबई महानगर प्रदेशातील सर्वसामान्य लोकांना होणार आहे. परंतु मुंबईतील जीवनशैली परवडत नाही म्हणून नवी मुंबईतील उलवे येथे राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाला मुंबईत येण्यासाठी २५० रुपये टोल कसा परवडणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी टोलचे दर कमी करण्याची मागणीही केली.

 

 मुंबई ट्रान्स हार्बर सागरी सेतूवरून बेस्ट, एसटी आणि NMMT या परिवहन सेवांच्या बसगाड्यांना परवानगी नाही. कोणताही मोठा प्रकल्प उभारताना तो जास्तीत जास्त सर्वसामान्यांसाठी कसा उपयोगात येईल,याचा विचार व्हायला हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. त्यासाठी या सागरी सेतूवर सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देत त्यांच्यासाठी एक मार्गिका राखून ठेवावी. तसंच या वाहनांना टोल आकारू  नये, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

WhatsApp channel